Kolhapur-ZP Election: करवीर तालुक्यात हाय होल्टेज लढती, इच्छुकांकडून जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:23 IST2026-01-13T18:22:52+5:302026-01-13T18:23:22+5:30
महायुतीकडे उमेदवारांची मांदियाळी काँग्रेसला उमेदवार शोधावे लागणार

Kolhapur-ZP Election: करवीर तालुक्यात हाय होल्टेज लढती, इच्छुकांकडून जोरदार तयारी
प्रकाश पाटील
कोपार्डे : करवीर तालुक्यातील १२ जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील तब्बल ७ मतदारसंघ सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहेत. सर्वसाधारण महिला ३ तर नागरिकांचा मागस प्रवर्गसाठी २ मतदारसंघात आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे इतर तालुक्यांपेक्षा करवीर तालुक्यात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. महायुतीकडे उमेदवारांची मांदियाळी आहे. मात्र काँग्रेसला उमेदवार शोधावे लागणार आहेत.
करवीर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक १२ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. गोकुळ शिरगाव, उचगाव, पाचगाव, निगवे खालसा, वडणगे, सडोली खालसा, पाडळी खुर्द असे तब्बल ७ मतदारसंघ सर्वसाधारण आहे. नव्याने उदयास आलेल्या पाडळी खुर्द मतदारसंघात भाजपचे डॉक्टर के. एन. पाटील, शिरोली दुमालाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील, राजेंद्र सूर्यवंशी यांच्यात काटे की टक्कर होणार आहे.
वडणगे मतदारसंघातून इंद्रजित पाटील, रवींद्र पाटील,सचिन चौगले यांनी तयारी सुरू केली आहे. निगवे खालसामधून सुमित चौगुले, सागर पाटील, प्रताप पाटील, रणजीत पाटील, एकनाथ पाटील, किरण पाटील, अजित चव्हाण, अभिषेक बोंद्रे अशी इच्छुकांची मोठी रांग आहे. गोकुळ शिरगाव मतदारसंघातून के. डी. पाटील, शशिकांत खोत, उदय पाटील अशी नावे चर्चेत आहेत.
शिंगणापूर, सांगरूळ, कळंबे तर्फे ठाणे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. शिंगणापूर मध्ये माजी शिक्षण सभापती रसिका पाटील, प्रियांका राजेंद्र दिवसे, डॉ. वर्षा इंद्रजित पाटील, रचना अविनाश पाटील, ज्योत्स्ना पाटील यांची जोरदार तयारी सुरू आहे. सांगरूळमध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्षा विमल पाटील, त्यांच्या सूनबाई धनश्री पाटील, रेखा प्रकाश मुगडे, कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांच्या पत्नी राजश्री खाडे, इंदूताई ज्ञानदेव नाळे, भाग्यश्री प्रशांत नाळे यांनी तयारी सुरू केली आहे. येथे काँग्रेसला उमेदवार शोधावा लागणार आहे. कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघात मनीषा अरुण टोपकर व वनिता सागर भोगम ही नावे चर्चेत आहेत.
शिये, मुडशिंगी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. शिये मतदारसंघातून कृष्णात पवार, चंद्रकांत पाटील, बाजीराव पाटील, विश्वनाथ पवार, प्रदीप पाटील अशी इच्छुकांची नावे आहेत आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक यांच्याबरोबर काँग्रेसमधून राहुल पाटील महायुतीत आल्याने ताकद वाढली आहे. आमदार सतेज पाटील यांना करवीरमध्ये काँग्रेसची ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. महायुतीत इच्छुकांची गर्दी आहे. यामुळे उमेदवार निवडताना नेत्यांची दमछाक होणार आहे.
एकूण जिल्हा परिषद मतदारसंघ - १२