Kolhapur- बाईक रायडर अपघात: हेल्मेट कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:47 IST2025-04-22T13:47:01+5:302025-04-22T13:47:57+5:30
तपास सुरू, धोकादायक वळणांवर फलक लावण्याच्या सूचना

Kolhapur- बाईक रायडर अपघात: हेल्मेट कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांच्या हाती
कोल्हापूर : आजरा-आंबोली मार्गावर माद्याळ फाट्याजवळ रविवारी (दि. २०) झालेल्या दुचाकी आणि कारच्या अपघातातील दुचाकीस्वार सिद्धेश विलास रेडेकर (वय २३, रा. माळी कॉलनी, टाकाळा) याच्या हेल्मेट कॅमेऱ्याचे फुटेज आजरा पोलिसांच्या हाती लागले आहे. फुटेजची तपासणी सुरू असून त्यातून अपघात नेमका कसा झाला, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांत याबाबत ठोस माहिती मिळेल, अशी माहिती आजरा पोलिसांनी दिली तसेच आजरा-आंबोली मार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भरधाव दुचाकीने कारला धडक दिल्यानंतर बाईक रायडर सिद्धेश रेडेकर याच्या डोक्यावरील हेल्मेट फुटून बाजूला पडले होते. त्यावरील कॅमेरा तुटून पडला होता. घटनास्थळाचा पंचनामा करताना आजरा पोलिसांना सिद्धेशचे हेल्मेट मिळाले. मात्र, कॅमेरा मिळाला नव्हता. पोलिसांनी रविवारी सायंकाळी पुन्हा घटनास्थळी जाऊन शोधमोहीम राबवली. त्यावेळी बाजूला पडलेला कॅमेरा पोलिसांना मिळाला.
तज्ज्ञांच्या मदतीने कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. यावरून दुचाकीचा वेग समजण्याची शक्यता आहे तसेच अपघात नेमका कसा घडला याचेही कारण समोर येईल, अशी माहिती आजरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.
रस्ता बनला धोकादायक
आजरा-आंबोली मार्गाचे रूंदीकरण केल्यानंतर वाहनांचा वेग वाढला आहे. प्रशस्त रस्त्यांवरून वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे धोकादायक वळणांवर सूचनाफलक लावून अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.