Kolhapur: पंचगंगा इशारा पातळीकडे; एसटीच्या १८ मार्गावर पाणी, राधानगरी धरण ७५ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:05 IST2025-07-05T12:05:05+5:302025-07-05T12:05:36+5:30

रात्रभर पाऊस, दिवसभर उघडझाप : ५३ बंधारे पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

Heavy rains in Kolhapur district, Panchganga nears warning level Radhanagari dam 75 percent full | Kolhapur: पंचगंगा इशारा पातळीकडे; एसटीच्या १८ मार्गावर पाणी, राधानगरी धरण ७५ टक्के भरले

Kolhapur: पंचगंगा इशारा पातळीकडे; एसटीच्या १८ मार्गावर पाणी, राधानगरी धरण ७५ टक्के भरले

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात जोरदार कोसळत आहे. राधानगरी धरण ७५ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद ७०९४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदी ३३.७ फुटापर्यंत पोहोचली असून, इशारा पातळीकडे आगेकूच केल्याने कोल्हापूरकरांची काळजी वाढली आहे. विविध नद्यांवरील ५३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गुरुवारी दिवसभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. रात्रभर एकसारखा पाऊस कोसळत राहिला, शुक्रवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ होत असून, राधानगरी धरण ७५ टक्के, तुळशी ७० टक्के, वारणा ७९ टक्के, तर दुधगंगा ५९ टक्के भरले आहे. त्यामुळे सर्वच धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. 

शुक्रवारी सकाळ ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १९ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी गगनबावड्यात अतिवृष्टी झाली आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. पंचगंगेचे पाणी संथ गतीने वाढत असले तरी इशारा (३९ फुटाकडे) पातळीकडे वाटचाल सुरू ठेवल्याने कोल्हापूरकरांची काळजी वाढली आहे.

अलमट्टीतून १ लाख घनफुटाचा विसर्ग

कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेल्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद ९४ हजार ७६७ घनफूट पाणी येत आहे, तर १ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी संथ गतीने वाढत आहे.

एसटीच्या १८ मार्गावर पाणी

जिल्ह्यात ४ राज्य व ९ प्रमुख जिल्हा मार्गांवर पाणी आहे. त्याचबरोबर एसटीच्या १८ मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

२१ ठिकाणी पडझड; ७.९५ लाखांचे नुकसान

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात २१ ठिकाणी खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ७ लाख ९५ हजारांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Heavy rains in Kolhapur district, Panchganga nears warning level Radhanagari dam 75 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.