कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी; ‘पंचगंगे’ची पातळी ७ फुटांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:28 IST2025-06-17T12:28:24+5:302025-06-17T12:28:55+5:30

बारा बंधारे पाण्याखाली, ‘राधानगरी’चा विसर्ग कायम

Heavy rains in five talukas including Gaganbawada in Kolhapur district; Level of Panchganga river increased by 7 feet | कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी; ‘पंचगंगे’ची पातळी ७ फुटांनी वाढली

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाने झोडपून काढले असून गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात सात फुटांनी वाढली असून, तब्बल १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

सोमवारी सकाळी आठ वाजता ‘पंचगंगे’ची पातळी १३ फुटांवर होती. सायंकाळी पाच वाजता २० फुटांवर पोहोचली. दरम्यान, आज मंगळवारीही कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

घटप्रभा धरण क्षेत्रात २२५ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात सर्वच धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाला आहे. घटप्रभा धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल २२५ मिलिमीटर, तर कुंभी व पाटगावमध्ये २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ‘राधानगरी’ धरण क्षेत्रात १७२, कासारी परिसरात १४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील १९ सर्कलमध्ये ढगफुटी

चंदगड, आजरा, कागल, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी व गगनबावडा तालुक्यातील १९ सर्कलमध्ये चोवीस तासांत ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये

  • हातकणंगले : ३०
  • शिरोळ - १९
  • पन्हाळा - ५४
  • शाहूवाडी - ५२
  • राधानगरी - ६५
  • गगनबावडा - १३५
  • करवीर - ४१
  • कागल - ६५
  • गडहिंग्लज - ४१
  • भुदरगड - ६५
  • आजरा - ६०
  • चंदगड- ७४

Web Title: Heavy rains in five talukas including Gaganbawada in Kolhapur district; Level of Panchganga river increased by 7 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.