Kolhapur: वळीव पावसाच्या तडाख्यात केळी बागा भुईसपाट, शाळू कोलमडला; पंचनाम्यांचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:02 IST2025-03-27T17:02:28+5:302025-03-27T17:02:58+5:30
ऐन काढणीच्या तोंडावर पिकांचे झालेल्या नुकसानीने शेतकरी हबकून गेला

Kolhapur: वळीव पावसाच्या तडाख्यात केळी बागा भुईसपाट, शाळू कोलमडला; पंचनाम्यांचे काम सुरू
आयुब मुल्ला
खोची : मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वळीव पावसाच्या तडाख्यात हातकणंगले तालुक्यातील निम्म्या गावातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळू, मका, हरभरा, गहू भुईसपाट तर केळी अर्ध्यातूनच तुटून पडली आहे. भाजीपाला उन्मळून पडून जमीनदोस्त झाला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना वेदना देणारे ठरले आहे. अंतिम टप्प्यातील नुकसानीने शेतकरी हबकून गेला आहे.
सोमवारी पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेला पाऊस सव्वातासाने थांबला. सुसाट वारे, झपाझप पडणारा धो-धो पाऊस यामुळे उभी पिके आडवी झाली. तर केळी तुटून पडली. भाजीपाला उखडून जागीच पडला. रात्री पिकांचे नुकसान झाले असेल, असा अंदाज आला होता. परंतु सकाळी शेतात पिकांची स्थिती पाहावयास गेलेला शेतकरी पिके किसलेली पाहून हतबल झाला. शासन नुकसानभरपाई देईल काय, या अपेक्षेने शेतकरी चौकशी करू लागला आहे.
पेठ वडगाव सर्कलमध्ये नुकसानीचा फटका सर्वात जास्त आहे. जनावरांच्या शेडचे पत्रे हवेत उडून ते दुसरीकडे जाऊन पडले आहेत. कुंभोज, वाठार, हातकणंगले परिसरातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. बुवाचे वाठार येथील केळीच्या बागेचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खोची, भेंडवडे, लाटवडे, भादोले परिसरात शाळू, मका, गहू पिकांचे साठ टक्के नुकसान झाले आहे. आडसाली ऊस जमिनीबरोबर झोपला आहे.
काढणीच्या काळातच पाऊस
रब्बी हंगामातील निम्म्याहून अधिक पिकांची काढणी झाली असून, उर्वरित पिकांची काढणी सुरू होणार होती. त्यामुळे नुकसान जास्त झाले आहे. शाळू ५००, गहू १००, हरभरा १००, मका १५ हेक्टर तर १०० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. एकरी दोन ते सव्वादोन लाख रुपये नुकसान केळी पिकाचे झाले आहे. जवळपास ८०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पंचनामे करण्याचे काम सुरू
कुंभोज ते नीलेवडी असा पूर्व पश्चिम विभागात वळीव तुफान बरसला आहे. भादोले परिसरात गारांचाही वर्षाव झाल्याने उसाचा पाला फाटला आहे. शेतात विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. झाडेही पिकात पडल्याने नुकसान झाले आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने यांनी प्रशासनाला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.
शाळू, गहू पिके काढताना कस होणार आहे. शाळू काळा पडणार असून कापणी मशीन नेताना अडचण होणार आहे. ऐन वाळण्याच्या स्थितीत असताना शाळू, गहू, हरभरा यास ओलावा लागला आहे. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण जास्त राहणार आहे. भाजीपाला तर उत्पादनाच्या अगोदरच नुकसानीचा ठरला आहे. - श्रीकांत पाटील, लाटवडे
किणीत प्राथमिक शाळेचे छप्पर उडाले
किणी : वादळी वाऱ्यामुळे किणी (ता. हातकणंगले) येथील जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्यामंदिर शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्र्याचे छत व घरे, जनावरांचे शेड अशा १४ ठिकाणचे पत्रे व छत उडून गेल्याने सुमारे ३५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शाळेच्या ग्राऊंडवर लावलेल्या उसाच्या रिकाम्या ट्राॅल्या पलटी झाल्या. ठिकठिकाणी विजेचे खांब मोडून तारा तुटल्या आहेत. माळवाडीवरील हैदर महाबरी यांच्या सहा खोल्यांवरील सिमेंट पत्र्याचे छत उडून गेले आहे. किणी तळसंदे रोडच्या कडेला असणारी हेमंत पाटील यांची एक एकरातील केळीची बाग भुईसपाट झाल्याने चार ते पाच लाख रूपये नुकसान झाले आहे.