वरुणराजाने अकरा दिवसांनंतर जोतिबा यात्रेतील गुलाल धुतला, उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:46 IST2025-04-23T17:44:40+5:302025-04-23T17:46:04+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला ...

वरुणराजाने अकरा दिवसांनंतर जोतिबा यात्रेतील गुलाल धुतला, उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून पहिल्यांदाच मोठा वळीव कोसळल्याने पिकांनाही पोषक ठरणार आहे.
मंगळवारी सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. कमाल तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहचल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यात किमान तापमान २५ डिग्रीपर्यंत राहिल्याने उष्म्यात वाढ झाली. दुपारी रस्त्यावरून जाताना गरम वाफा अंगाला भाजत होत्या. दुपारनंतर कोल्हापूर शहरात पावसाचे वातावरण झाले, रात्री आठ वाजता सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली.
त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटाने मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. कानठळ्या बसवणारा विजेचा आवाज होता. सुमारे अर्धा तास पावसाने शहरासह परिसराला झोडपून काढले.
दरम्यान, आज, बुधवारी तापमान कायम राहणार असले तरी पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी
अर्धा तास एक सारखा पाऊस कोसळत राहिल्याने कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गटर्स तुडुंब भरून वाहू लागल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी पसरले होते.
अकरा दिवसांनंतर गुलाल धुतला
दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर हमखास पाऊस येतो. यात्रेत उधळलेला गुलाल पाऊस धुऊन काढतो. यंदा १२ एप्रिलला चैत्र यात्रा पार पडली. त्यानंतर भाविकांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर अकरा दिवसांनी गुलाल धुण्यासाठी वरुणराजा आला.