Kolhapur: गगनबावड्यात अतिवृष्टी; पंचगंगेच्या पातळीत पाच फुटाने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:54 IST2025-07-16T11:53:46+5:302025-07-16T11:54:21+5:30
वारणा धरणातून विसर्ग वाढवला

Kolhapur: गगनबावड्यात अतिवृष्टी; पंचगंगेच्या पातळीत पाच फुटाने वाढ
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने राधानगरी व दूधगंगा धरणातून विसर्ग कायम असला तरी वारणातून विसर्ग वाढला आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल पाच फुटाने वाढली असून, विविध नद्यांवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यात तब्बल ११३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी रात्रीपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी पहाटेपासून तर एकसारख्या पावसाने झोडपून काढले. सकाळी ११ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर उघडीप दिली. पण, अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३२.४ मिलीमीटर व पन्हाळ्यात ४४.४ मिमी, शाहूवाडीत ५३.६, राधानगरीत ३२.९, तर गगनबावड्यात ११३.४ मिमी पाऊस झाला.
धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरण क्षेत्रात चोवीस तासांत तब्बल १२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण ८७ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद ३१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरण ८२ टक्के भरले आहे, त्यातून ८५३०, तर दूधगंगा धरण ७१ टक्के भरल्याने त्यातून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा २१ फुटावर होती. रात्री ८ वाजेपर्यंत २६ फुटांच्या वर गेली. दिवसभरात १७ नवीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.