Kolhapur Crime: मित्राला सांगूनच त्याने प्रेयसीचा खून केला अन् जंगलात स्वत:लाही संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:32 IST2025-06-06T15:31:37+5:302025-06-06T15:32:55+5:30

लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून करणाऱ्या सतीश यादवने तिला अन् स्वत:लाही संपवले

He killed his live in girlfriend after telling his friend and then ended his own life in kolhapur | Kolhapur Crime: मित्राला सांगूनच त्याने प्रेयसीचा खून केला अन् जंगलात स्वत:लाही संपविले

Kolhapur Crime: मित्राला सांगूनच त्याने प्रेयसीचा खून केला अन् जंगलात स्वत:लाही संपविले

कोल्हापूर : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा खून करून स्वत:ही जीवन संपवणार असल्याचे सतीश मारुती यादव (वय २७, सध्या रा. शिवाजी पेठ, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री, ता. पन्हाळा) याने आधीच मित्राला सांगितले होते. मंगळवारी (दि. ३) दुपारी दोनच्या सुमारास त्याने मित्राला फोन केला आणि अवघ्या अर्ध्या तासात प्रेयसीचा खून करून तो निघून गेला. बुधवारी (दि. ४) सकाळी त्याने शाहूवाडी तालुक्यातील कातळेवाडी-बांद्रेवाडी येथील धरणाजवळ झाडाला गळफास घेऊन स्वत:ला संपवले.

तपास पथकातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिव्ह इनमधील प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगे (वय २३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हिचा खून करण्यापूर्वी हल्लेखोर सतीश यादव हा मंगळवारी मोबाइलवरून मित्रांच्या संपर्कात होता. सकाळपासूनच तो दारूच्या नशेत होता. दुपारी दोनच्या सुमारास त्याने प्रकाश सुळेकर या मित्राला फोन केला. समीक्षाचा खून करून स्वत:ही जीवन संपवणार असल्याचे त्याने मित्राला सांगितले. त्यानुसार अर्ध्या तासातच त्याने सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात समीक्षाचा चाकूने भोसकून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू अंपले या दोघींना घरात कोंडून तो दुचाकीवरून निघून गेला.

कोल्हापुरातून तो बाजार भोगाव येथे पोहोचला. तिथे एका मित्राकडून २०० रुपये घेतले. दुचाकीत पेट्रोल टाकून तो रात्री शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्र अरुण सुतार याच्या घरी गेला. बुधवारी सकाळी घरातले कोणी उठण्यापूर्वीच तो दुचाकी घेऊन निघून गेला. काही वेळाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक नांदारीत सुतार याच्या घरी पोहोचले होते. त्यांनी सुतार याला सोबत घेऊन दिवसभर सतीशचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर गुरुवारी सकाळी तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शेतकऱ्यांना दिसला मृतदेह

शेतात निघालेल्या शेतकऱ्यांना झाडाला लटकलेला मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती पोलिस पाटलांना दिली. त्यानंतर शाहूवाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गांधीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तिथेच काही अंतरावर सतीशची दुचाकी होती. मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून त्याची दुचाकी आणि मोबाइल जप्त केला.

नातेवाइकांसह ४० जणांकडे चौकशी

हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांनी त्याच्या मोबाइलवर कॉल केलेल्या व्यक्तींची यादी काढली. त्याचे मित्र, नातेवाईक आणि पै-पाहुणे अशा ४० जणांकडे चौकशी केली. यातील २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. शाहूवाडी, पन्हाळा आणि भुदरगड तालुक्यांत पोलिसांनी छापेमारी करून हल्लेखोरांचा शोध घेतला. जिल्ह्यातील सर्व लॉजची तपासणी करून २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: He killed his live in girlfriend after telling his friend and then ended his own life in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.