..तर मी स्वतः त्यांना मदत करीन, सतेज पाटील यांचे आव्हान पालकमंत्री आबिटकरांनी स्वीकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:00 IST2025-11-18T11:59:42+5:302025-11-18T12:00:55+5:30
सतेज पाटील यांनी आरोग्य विभागातील गैरव्यवहार उघड करण्याची घोषणा

..तर मी स्वतः त्यांना मदत करीन, सतेज पाटील यांचे आव्हान पालकमंत्री आबिटकरांनी स्वीकारले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये १३ विरुद्ध ० असा विक्रमी विजय मिळवण्याचा महायुतीचा संकल्प असल्याचा दावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शासकीय विश्रामधामवर विविध विभागांच्या आढावा बैठकीपूर्वी ते बोलत होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले सर्व ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षांना एकत्र घेऊनच निवडणूक लढणार आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यास निवडून आलेल्या उमेदवाराला महायुतीत सामावून घेतले जाईल. जिल्ह्यात १३ विरुद्ध ० असा न भूतो , न भविष्यति असा विजय आम्ही मिळवू.
सतेज यांचे आव्हान स्विकारले..
आमदार सतेज पाटील यांनी आरोग्य विभागातील गैरव्यवहार उघड करण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले, आमदार पाटील यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारतो. गैरव्यवहार बाहेर काढायचे असतील तर मी स्वतः त्यांना मदत करीन.
आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचे पुरावे उघडे करणार - आमदार सतेज पाटील
कळंबा : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या स्वार्थापोटी जवळ आलेले आता बाजूला गेले आहेत. ज्यांना जवळ केले ते उलटले; पण हिशेब करणार हे नक्की आहे. विरोधकांकडून आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचा पैसा येत्या पालिका निवडणुकीत वापरला जाईल. त्याची कागदपत्रे योग्य वेळी उघडी करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. प्रभाग क्रमांक वीस अंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार ऋतुराज पाटील होते.
सतेज पाटील म्हणाले, भाजप जती-जातींत भांडणे लावून सोशल मीडियाचा गैरवापर करीत आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत आलेला पक्ष आहे. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मधुकर रामाने, शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अरुण पाटील, इंद्रजित बोंद्रे, राहुल माने, धीरज पाटील, कळंबाचे सरपंच सुमन गुरव, व्ही. व्ही. आंबोळे आदी उपस्थित होते.