Kolhapur: कुंभोज रोडवर तिहेरी अपघात; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून आजोबा, नात ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:54 IST2025-11-11T17:53:43+5:302025-11-11T17:54:25+5:30
सुट्टीसाठी मामाच्या गावाला गेली होती. परत येताना काळाने घाला घातला

Kolhapur: कुंभोज रोडवर तिहेरी अपघात; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून आजोबा, नात ठार
हातकणंगले: हातकणंगले येथील कुंभोज रोडवरील ट्रॅक्टर, जीप आणि दुचाकी यांच्या अपघातात आनंदराव बापूसोा जाधव (वय ५५, रा. लाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि सानिका संजय संपकाळ (२१, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) हे आजोबा आणि नात ठार झाले. हा अपघात सोमवारी झाला. याबाबतचा गुन्हा रात्री उशिरा हातकणंगले पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभोज येथील नात सानिका संपकाळला गावी सोडण्यासाठी आनंदराव जाधव दुचाकीवरून हातकणंगले येथून कुंभोजकडे जात होते. गावच्याबाहेर असलेल्या एका हॉटेलसमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत आजोबा आणि नात उसाने भरलेल्या ट्राॅलीच्या मागील चाकाखाली सापडुून गंभीर जखमी झाले.
जखमींना तत्काळ सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच दोघांचा सायंकाळी मृत्यू झाला. अपघाताचा गुन्हा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंदविण्यात आला आहे.
सुट्टीत मामाच्या गावाला
सानिका ही इचलकरंजी येथील कॉलेजमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. सुट्टीसाठी ती मामाच्या गावाला गेली होती. परत येत असताना काळाने घाला घतला.