विधान परिषद आमदारकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक; पण मिळणार कोणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:18 IST2025-02-03T12:17:21+5:302025-02-03T12:18:04+5:30
महायुतीकडून मादनाईकांचे नांव

विधान परिषद आमदारकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक; पण मिळणार कोणाला?
कोल्हापूर : राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकीसाठीकोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक आहेत. यापूर्वी बारा पैकी सात जागा भरल्या असून, पाच जागा रिक्त आहेत. यासाठी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार संजय मंडलिक, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह भाजपचे महेश जाधव, शिंदेसेनेचे सत्यजीत कदम आदींची नावे चर्चेत आहेत. पण, एकट्या कोल्हापूरला किती जागा देणार? हेही महत्त्वाचे आहे. यापूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना ए. वाय. पाटील यांचेही नाव प्रत्येकवेळी चर्चेत यायचे, परंतु त्यांना काय संधी मिळालीच नाही.
विधानसभेच्या इच्छुकांना गाजर दाखवण्यासाठी या पाच जागा रिक्त ठेवल्या होत्या. शिवाय विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्या जागाही रिक्त होत आहेत. त्यामुळे अनेकांना आपल्याला संधी मिळेल असे वाटते. आता, विधानसभेला शब्द दिलेल्यांनी आपआपल्या नेत्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत. एकाच जिल्ह्यात किती जणांना संधी देणार हे खरे असले तरी हाळवणकर, मंडलिक व डोंगळे यांनी नेत्यांकडे निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे लोकसभेला पराभव झाल्यावर जसे भावना गवळी यांचे पुनर्वसन झाले तसेच पुनर्वसन मंडलिक यांचेही केले जाईल, अशा घडामोडी आहेत. आमदार होऊन कामे करायची आणि ताकदीने लोकसभेला सामोरे जायचे यासाठी त्यांना बळ दिले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
महायुतीकडून मादनाईक यांचे नाव
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांचे नाव महायुतीकडून ‘कोल्हापूर स्थानिक स्वराज्य’ संस्था गटातून पुढे करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला अजून दोन वर्षाचा कालावधी आहे, तत्पूर्वी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीकडून पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कागदावर महायुती सध्या तरी भक्कम दिसते, सगळे एकसंध राहिले तरच मादनाईक सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात.
हातकणंगले, शिरोळात दोनशेपेक्षा अधिक मते
इचलकरंजी महापालिकेसह पेठवडगाव, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ नगरपालिका व हातकणंगले, हुपरी नगरपंचायती त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे १६ व हातकणंगले, शिरोळचे दोन सभापती असे दोनशेपेक्षा अधिक मते हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील आहेत. या संस्थांवर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचे प्राबल्य राहिले आहे. हेच गणित पाहून मादनाईक यांना पुढे करून सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची रणनीती आहे.