Kolhapur: ‘गोकुळ’ चीज, आईस्क्रीम तयार करणार; संचालक मंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:33 IST2025-08-14T18:33:27+5:302025-08-14T18:33:58+5:30
‘मुऱ्हा’प्रमाणेच ‘पंढरपुरी’ म्हशीला अनुदान द्या

Kolhapur: ‘गोकुळ’ चीज, आईस्क्रीम तयार करणार; संचालक मंडळाचा निर्णय
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ परराज्यांतील जातीवंत म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर पंढरपुरी म्हशीलाही द्या, अशी मागणी संघाच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते.
‘गोकुळ’ने यापूर्वी आईस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पावसाळ्यानंतर केली जाणार आहे. बाजारात चीजला खूप मागणी आहे, ‘गोकुळ’ने हे उत्पादन करावे, असे प्रयत्न सुरू होते. त्याला संचालक मंडळाच्या सभेत मान्यता देण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर येथे चीज उत्पादन प्रकल्प आहे. ते उत्पादन घेत नाहीत, त्या ठिकाणी ‘गोकुळ’ने उत्पादन सुरू केले तर त्याचा फायदा होईल. अशी चर्चाही सभेत झाली.
हरियाणा, गुजरात येथील ‘मुऱ्हा’ म्हैस खरेदीवर ‘गोकुळ’ ५० हजार रुपये अनुदान देते. त्याच धर्तीवर पंढरपुरी म्हशीला अनुदान द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
अनुदानाबरोबर म्हैशीच्या किमतीही वाढल्या
‘मुऱ्हा’ म्हैशीच्या अनुदान दहा रुपयांची वाढ करत ५० हजार रुपये केले. पण, अनुदानात जशी वाढ होईल, तशा म्हैशींच्या किमती वाढू लागल्या आहेत. वर्षांपूर्वी साधारणता लाख-सव्वा लाखाला मिळणाऱ्या म्हशींच्या किमती दीड लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे वाढीव अनुदानाचा शेतकऱ्यांऐवजी संबंधित म्हैस मालकालाच अधिक होत असल्याचे काही संचालकांनी निदर्शनास आणून दिले.
केर्लीप्रमाणे गडहिंग्लजला गोठा करणार
एनडीडीबीच्या सहकार्याने जातीवंत म्हैशींचा केर्ली (ता. करवीर) येथे गोठा आहे. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याच धर्तीवर गडहिंग्लज येथे गोठा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.
९ सप्टेंबरला ‘गोकुळ’ची सभा
‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा दि. ९ सप्टेंबरला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. १८) पासून तालुकानिहाय संपर्क सभेचे आयोजन केले आहे.
संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चीज व आईस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरेाबर गडहिंग्लज येथे जातीवंत म्हशींचा गोठा एनडीडीबीच्या माध्यमातून सुरू केला जाणार आहे. - नविद मुश्रीफ (अध्यक्ष, गोकुळ)