Kolhapur: ‘गोकुळ’ची शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट; दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:50 IST2025-08-30T13:50:13+5:302025-08-30T13:50:28+5:30

सोमवारपासून अंमलबजावणी : संस्था इमारत अनुदानासह, दूध संस्था कर्मचाऱ्यांना ७० पैसे मिळणार

'Gokul' Milk Association increases purchase price of buffalo and cow milk by Rs 1 per liter | Kolhapur: ‘गोकुळ’ची शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट; दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ

Kolhapur: ‘गोकुळ’ची शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट; दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर, दूध संस्था इमारत अनुदानासह त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानातही वाढ करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. सोमवारपासून (दि. १) दूध खरेदी दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे.

मात्र, दोन्ही दुधाच्या विक्रीत सध्या तरी कोणतेही वाढ केली जाणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले. म्हैस व गाय खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ केल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना महिन्याला ४ ते ५ कोटी रुपये जादा पैसे मिळणार आहेत.

असा मिळणार उत्पादकांना दर.

म्हैस

फॅट/ एसएनएफ/ सध्याचा दर/ वाढीव दर
६.०/ ९.० / ५०.५० / ५१.५०
६.५/ ९.० / ५४.८० /५५.८०

गाय
३.५/८.५  /३२.००  /३३.००

संस्था इमारत अनुदानात ८ ते १० हजारांची वाढ

इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य दर व मजुरांचे पगार वाढल्याने दूध संस्थांसमोर आर्थिक अडचण येत आहे. त्यासाठी दूध संकलनानुसार अनुदानात ८ ते १० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.

दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ

दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रतिलिटर ६५ पैसे दिले जात होते, त्यात ५ पैशांची वाढ केल्याने आता ७० पैशांप्रमाणे संस्थांना दिले जाणार आहेत. यासाठी वार्षिक सुमारे तीन कोटी रुपयांचा भार संघावर पडणार आहे.

चार जनावरांच्या मुक्त गोठ्यालाही अनुदान

मुक्त गोठा अनुदान योजनेत अनुदानासाठी किमान पाच जनावरांची अट होती. ही अट शिथिल करून चार जनावरांच्या गोठ्यालाही अनुदान दिले जाणार आहे.

दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करत असताना दूध दराच्या माध्यमातून त्यांच्या श्रमाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दूध संस्थांचे कर्मचारीही महत्त्वाचा घटक असल्याने त्यालाही सक्षम करण्याची भूमिका घेतली. सध्या जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ७५०० दूध संस्थांच्या माध्यमातून प्रतिदिन १६ लाख लिटर संकलन केले जाते. लवकरच २० लाखांचा टप्पा पार केला जाईल. - नविद मुश्रीफ (अध्यक्ष, ‘गोकुळ’)

Web Title: 'Gokul' Milk Association increases purchase price of buffalo and cow milk by Rs 1 per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.