‘थेट’ पाणी ढवळलं, ‘गोकुळ’चं दूध उकळलं, कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापलं
By समीर देशपांडे | Updated: September 1, 2025 12:26 IST2025-09-01T12:24:14+5:302025-09-01T12:26:09+5:30
‘गोकुळ’ आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार

‘थेट’ पाणी ढवळलं, ‘गोकुळ’चं दूध उकळलं, कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापलं
समीर देशपांडे
कोल्हापूर : घरात बाप्पा बसवल्यानंतर उकडीचे मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या, कानोले, कडबू करून बाप्पांना नैवेद्य दाखवून घरच्यांना सणावाराचे खायला घालायचे सोडून शहर आणि परिसरातील अनेक महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. त्यामुळे कोल्हापूरचे ‘थेट’ पाणी ढवळून निघाले आहेत. तर दुसरीकडे एकीकडे ज्या दुधाच्या खव्यापासून बाप्पांसाठी मोदक तयार केले गेले त्याच ‘गोकुळ’च्या दुधाच्या राजकारणाला उकळी फुटली आहे.
‘गोकुळ’ आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही रंगीत तालीम सुरू आहे. यापुढच्या काळात या दोन्ही संस्थांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीचे भांडवल होणार आणि याच भांडवलाच्या जोरावर ‘सत्तासुंदरी’ प्राप्तीसाठी प्रयत्न होणार, हे निश्चित आहे. त्यामुळेच ऐन गणेशोत्सवामध्ये रस्त्यावर बोंब मारणे सुरू आहे आणि पत्रकार परिषदांमधून आरोप, प्रत्यारोप होत आहेत.
महाविकास आघाडी सत्तेत असताना याच दसरा चौकाच्या मैदानातून ‘थेट पाइपलाइन केली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही’ असे खणखणीत भाषेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. २०१९ नंतरच्या काळात याच शब्दाचा आधार घेत तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही योजना पूर्ण केली आणि दिवाळीच्या आधी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता पुईखडीला जाऊन त्यांनी कर्तव्यपूर्तीची अंघोळही केली; परंतु या गोष्टीला आता पावणेदोन वर्षे झाली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी थेट पाइपलाइनच्या पाणीपुरवठ्यात सतत काही ना काही अडचणी येत गेल्या. आता तर ऐन सणात पाणीपुरवठा बंद पडल्याने नागरिक वैतागले आणि रस्त्यावर उतरले. त्याला महायुतीने आणखी हवा दिली आणि सतेज पाटील यांना ‘लक्ष्य’ करण्याची संधी सोडली नाही.
‘गोकुळ’चं जाजम आणि राष्ट्रवादीचं घड्याळ
- दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून एकाच जाजमावर येऊन निवडणुकीची तयारी करायची वेळ असताना जाजम खरेदीवरूनच ‘गोकुळ’च्या दुधाला उकळी फुटली आहे. ज्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची मनीषा माजी अध्यक्ष अरुण डोंगळे बाळगून आहेत, त्याच पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाच्या खरेदीवरून सध्या ‘गोकुळ’ची चौकशी सुरू झाली आहे.
- चार महिन्यांपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणाची कूस बदलणाऱ्या ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीनंतर महायुती प्रबळ होत असताना उद्धवसेनेने याप्रकरणी जोरदार आंदोलन करून चौकशीची मागणी करणे, हे महाविकास आघाडीच्या अजेंड्याला धरूनच आहे; पण भाजपचे अतुल सावे दुग्ध विकास मंत्री असताना या प्रकरणाच्या चौकशीचे तातडीने आदेश देणे, हे अनाकलनीय आहे.