Kolhapur- Gokul Dudh Sangh: मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर डोंगळेंनी दिला राजीनामा, नवीन अध्यक्ष निवड कधी.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:21 IST2025-05-21T12:21:06+5:302025-05-21T12:21:31+5:30
कार्यकारी संचालकांकडे केला सादर : गुरुवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी

Kolhapur- Gokul Dudh Sangh: मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर डोंगळेंनी दिला राजीनामा, नवीन अध्यक्ष निवड कधी.. वाचा
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र त्यांच्या प्रतिनिधींनी संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्याकडे सादर केले. गुरुवारी (दि. २२) संचालक मंडळाची बैठक होत असून, यामध्ये डोंगळे यांचा राजीनामा मंजूर केला जाणार आहे. सभेच्या नोटिसा मंगळवारीच काढण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करत अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यावरून गेले सात दिवस वादळ उठले होते. रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची सूचना केली होती.
त्यानुसार डोंगळे सोमवारी दुपारीच मुंबईकडे रवाना झाले. मंगळवारी सकाळी ते मंत्री मुश्रीफ यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. तिथे चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले यांच्याकडे राजीनामा दिला.
मुश्रीफ यांचा इशारा...
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी डोंगळे यांचे बंड मोडून काढत असतानाच इतर सहकारी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिल्याची चर्चा सहकारात सुरू आहे.
सोमवारीच राजीनामा तयार
अरुण डोंगळे सोमवारी मुंबईला जाण्यापूर्वी राजीनामा लिहून गेले होते. मुंबईतून त्यांनी प्रतिनिधींना फोन करून कार्यकारी संचालकांकडे देण्यास सांगितले.
नवीन निवड ३१ मेपूर्वी
गुरुवारी राजीनामा मंजूर केल्यानंतर प्राधिकरणाकडून नवीन निवडीचा कार्यक्रम तातडीने घेतला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री १ ते १२ जून परदेशात जाणार आहेत. त्यानंतर निवड करायची म्हटले तर नव्याने फाटे फुटायला नको, म्हणून ३१ मेपूर्वी नवीन अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.