ऊसाने भरलेल्या ट्रँक्टरचे पुढचे चाक निखळले, सुदैवाने चालक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:16 IST2021-12-06T18:14:20+5:302021-12-06T18:16:27+5:30
कुंभी कासारी कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टरचे अचानक पुढचे चाक निखळले. सुदैवाने यात ट्रँक्टर चालकाला कोणतीही इजा झाली नाही.

ऊसाने भरलेल्या ट्रँक्टरचे पुढचे चाक निखळले, सुदैवाने चालक बचावला
कोपार्डे - कुंभी कासारी कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टरचे अचानक पुढचे चाक निखळले. यामुळे ट्रँक्टर व ऊसाने भरलेली ट्राँली रस्त्याला असणाऱ्या पदपथावर चढल्याने भर रस्त्यावर ऊसासह ट्रँक्टर - ट्राँली पलटी झाली. सुदैवाने यात ट्रँक्टर चालकाला कोणतीही इजा झाली नाही. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. अपघाता दरम्यान रस्त्यावर कोणतेही वाहन अथवा पादचारी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी की, बाळू बाबू गोठम (रा. तांदूळवाडी ता. पन्हाळा) यांच्या मालकीचा हा ट्रँक्टर आहे. ते कुंभी कासारी कारखान्याकडे ट्रँक्टर (क्रमांक एम एच ०९ - ५७८३) ने तांदूळवाडीतून ऊस वाहतूक करतात. आज ऊसाने भरलेला ट्रँक्टर ट्रॉली घेवून कुंभी कासारी ते गगनबावडा रस्त्यावरून कारखान्याच्या कार्यस्थळावर गेस्टहाऊस जवळ आले असता अचानक ट्रँक्टरच्या पुढील चाकाचा स्पींडल तुटला.
यामुळे ट्रँक्टर ट्रॉलीसह रस्त्या लगत असणाऱ्या उंच फुटपाथवर चढला. यात ऊसाने भरलेली ट्रॉली रस्त्यावरच पलटी झाली. यावेळी मोठा आवाज झाल्याने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेला ऊस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.