Kolhapur: जेलमधील मित्र, सुटल्यावर बनावट नोटा खपविण्याचे सत्र; चौघांना बुधवारपर्यंत कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:04 IST2025-06-21T18:04:56+5:302025-06-21T18:04:56+5:30

गडहिंग्लजमधील बनावट नोटा प्रकरणाचा १२ तासांत छडा

Friends in jail conspired to start a business of selling fake currency, Gadhinglaj case solved within 12 hours | Kolhapur: जेलमधील मित्र, सुटल्यावर बनावट नोटा खपविण्याचे सत्र; चौघांना बुधवारपर्यंत कोठडी 

Kolhapur: जेलमधील मित्र, सुटल्यावर बनावट नोटा खपविण्याचे सत्र; चौघांना बुधवारपर्यंत कोठडी 

गडहिंग्लज : बहुराष्ट्रीय बँकेच्या येथील शाखेच्या ‘सीडीएम’ मशीनमध्ये भरण्यात आलेल्या बनावट नोटांचा गडहिंग्लज पोलिसांनी १२ तासात छडा लावला. त्यातून शिक्षा भोगून आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील ‘जेल’मधील मित्रांनी संगनमताने बनावट नोटा खपवण्याचा धंदा सुरू केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अटकेतील चौघांनाही येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी बुधवारपर्यंत (२५ जून) पोलिस कोठडी दिली आहे.

आकाश रवींद्र रिंगणे (वय २८, नदीवेस खोत गल्ली, गडहिंग्लज), नितीन भैरू कुंभार (वय ३३, कुंभार गल्ली, गडहिंग्लज), अशोक महादेव कुंभार (वय ५४, प्रभुवाडी गल्ली चिक्कोडी), दिलीप सिद्धाप्पा पाटील (वय ४३, बिद्रेवाडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, येथील भडगाव रोडवर संबंधित बँकेची शाखा असून बँकेच्या प्रवेशद्वारासमोरच ग्राहकांच्या सोयीकरिता एटीएम-सीडीएम मशीन बसवण्यात आले आहे.

मंगळवारी (१७) मध्यरात्री आकाशने सीडीएमद्वारे आपल्या खात्यावर १७,५०० रुपये भरले होते. मात्र, त्याने भरलेल्या ५०० रुपयांच्या ३५ नोटा बनावट असल्याचे ‘सीएसएम’ कंपनीच्या कर्मचा-यांना निदर्शनास आले. नोटांच्या पडताळणीअंती उपशाखाधिकारी गौरव खरबुडे यांनी पोलिसात बँकेच्या फसवणुकीची फिर्यादी दिली आहे.

अशी झाली कारवाई

पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी फिर्याद दाखल होताच संशयित आकाशला तातडीने ताब्यात घेतले. त्याने त्या नोटा नितीनकडून घेतल्याचे व नोटा मशीनमध्ये भरताना तोही सोबत असल्याचे सांगितले. नितीनने अशोकडून दिलीपमार्फत २० हजाराच्या बनावट नोटा घेतल्याचे सांगितले. एकमेकांचे नातेवाईक असणा-या नितीन व अशोकलाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीत चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

तीन वर्षातील दुसरा गुन्हा

२७ ऑगस्ट २०२२ रोजी गडहिंग्लज पोलिसांनी ५ रस्ता महागाव येथे सापळा रचून १,८८,६०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्या नोटा देण्यासाठी आलेल्या बेळगावच्या एकासह महागावातील चौघांना अटक झाली होती. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे.

शिक्षा भोगून बाहेर..पुन्हा धंदा सुरू!

यापूर्वी आरोपी अशोकला बनावट नोटाप्रकरणी ६ वर्षांची शिक्षा झाली असून दिलीपला अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. जेलमध्ये असतानाच दोघांची मैत्री झाली असून त्यांनी संगनमताने पुन्हा बनावट नोटा खपवण्याचा धंदा सुरू केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

बनावट नोटा येतात कुठून?

सीमाभागात बनावट नोटा चलनात आणणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचे तपासातून पुढे आले आहे. बनावट २० हजारपैकी उर्वरित अडीच हजारांच्या नोटा जप्त करण्याबरोबरच बनावट नोटा कुठून येतात? याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Web Title: Friends in jail conspired to start a business of selling fake currency, Gadhinglaj case solved within 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.