Kolhapur Crime: गाड्या भाड्याने लावतो म्हणून अकरा लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:42 IST2025-11-13T16:41:08+5:302025-11-13T16:42:16+5:30
सुरुवातीचे दोन महिने ऑनलाइन भाडेही पाठवले. त्यानंतर भाडे पाठवणे बंद झाले व संपर्कही बंद केला

Kolhapur Crime: गाड्या भाड्याने लावतो म्हणून अकरा लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
चंदगड : गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून ११ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मजरे शिरगाव येथील एकासह दोघांवर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दयानंद पुंडलिक मुळीक (रा. मजरे शिरगाव, ता. चंदगड) व अस्लम अमीन मुलानी (रा. जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मुळीक याने मुलाणी यांच्या संगनमताने हिंडाल्को कंपनीकडे गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून चार गाड्या आणल्या. सुरुवातीचे दोन महिने त्यांना ऑनलाइन भाडेही पाठवले. त्यानंतर भाडे पाठवणे बंद झाले व संपर्कही बंद केला. त्यामुळे गाडी मालकांना संशय आल्यानंतर त्यांनी जीपीएसद्वारे आपल्या गाड्यांची माहिती घेतली. फसवणूक झाल्याचे कळल्यावर पोलिसांत फिर्याद दिली.
मुळीक यांनी या चारही गाड्या बेळगाव येथील सावकार सुभाष डे व परभणी जिल्ह्यातील सेलगाव येथील नागनाथ विटकर व नायरकर यांच्याकडे गहाण ठेवून आठ लाख रुपये उचलले. या सर्व गाड्यांचे तीन महिन्यांचे तीन लाख रुपये भाडेही थकवले. सर्व मिळून ११ लाख रुपयांची फसवणूक केली. शकील अरीफ काझी रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलिस निरीक्षक विजय कोळेकर तपास करीत आहेत.
प्रकरणे बाहेर पडणार
फसवणूक झालेल्या गाड्यांचा शोध घेताना त्यातील एक गाडी दारू तस्करीमध्ये पकडल्याने जीपीएसद्वारे चंदगड पोलिस ठाण्यात ती आढळून आली. त्यानंतर अधिक तपास केला असता इतर गाड्यांचा उलगडा झाला. यामुळे यातून अजूनही काही प्रकरणे बाहेर पडण्याची शक्यता आहे.