Kolhapur: नवरात्रौत्सवाच्या तीन दिवसांत चार लाख भाविक अंबाबाईचरणी; शुक्रवार ते रविवारी उच्चांकाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:26 IST2025-09-25T18:25:47+5:302025-09-25T18:26:40+5:30
पर्यटन, खरेदीने बाजारपेठेत उत्साह

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तीन दिवसांत ४ लाख २१ हजार ८३० भाविकांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. बुधवारी रात्री देवीची पालखी मोर आकारात काढण्यात आली. शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. परस्थ भाविकांचे शहरातील पर्यटन आणि खरेदीमुळे कोल्हापुरातील बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे.
नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील लाखो भाविक येतात. सोमवारपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला आहे, तेव्हापासून मागील तीन दिवसांत सव्वाचार लाख भाविक अंबाबाईचरणी लीन झाले. बुधवारीही अंबाबाई मंदिराचा आवार भाविकांनी फुलून गेला होता. अंबाबाईच्या दर्शनानंतर भाविक जवळच तुळजाभवानी देवीचे दर्शन घेत आहेत.
यानंतर, त्यांची पावले वळतात ती महाद्वार रोड, जोतिबा रोडवर. महाद्वार बाजारपेठ म्हणजे स्वस्त आणि मस्त खरेदी. येथे भाविक कपडे, नऊवारी साड्या, महाराष्ट्रीयन पद्धतीच्या साड्या, कोल्हापुरी साज, ठुशी, लक्ष्मीहार अशा इमिटेशन ज्वेलरीसह कोल्हापुरी चप्पलची खरेदी करत आहेत, तसेच शहरातील न्यू पॅलेस, रंकाळा, टाऊन हॉल म्युझिअम अशा पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत.
साउंड सीस्टिमवरून पूजेची माहिती
नवरात्रौत्सवात अंबाबाईची रोज वेगवेगळ्या देवीच्या रूपात पूजा बांधली जात आहे. देवीचे हे नेमके कोणते रूप आहे, मूर्ती कशी आहे, देवीच्या या स्वरूपामागील पौराणिक संदर्भ, तिची उपासना केल्यानंतर होणारा लाभ, अशी सर्वंकष माहिती मंदिर परिसरातील हेरिटेज म्युझिकल पोलवरून सांगितली जात आहे. अंबाबाई मंदिर, बिंदू चौक, खासबाग, महाद्वार, गुजरी या परिसरात हे १२० खांब असून, त्यावर सकाळपासून देवीचे मंत्रोच्चार, गाणी व अंबाबाईची पूजा बांधल्यानंतर पूजेची माहिती सांगितली जात आहे. श्रीपूजक मंडळातर्फे याची ऑडिओ क्लिप बनविण्यात आली आहे.
भाविक संख्या
- सोमवार : १ लाख १८ हजार ४१७
- मंगळवार : १ लाख ७८ हजार २०७
- बुधवार : १ लाख २५ हजार २०६
- एकूण : ४ लाख २१ हजार ८३०