Kolhapur News: व्हॉटसॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर; करनुरात तणाव, दगडफेकीत चौघे जखमी; पोलिस छावणीचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:02 IST2026-03-13T12:02:11+5:302026-03-13T12:02:35+5:30
गावात तणावाचे वातावरण

Kolhapur News: व्हॉटसॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर; करनुरात तणाव, दगडफेकीत चौघे जखमी; पोलिस छावणीचे स्वरुप
कागल : करनूर (ता. कागल) येथे व्हॉटसॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या कारणावरून काही तरुणांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोन गटांत दगडफेक झाली. यामध्ये चारजण किरकोळ जखमी, तर एका चारचाकीचे व दोन मोटरसायकलींचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मराठी शाळेजवळ घडली.
याघटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटांतील ज्येष्ठ लोकांनी व पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तरुणांना शांत केले. याप्रकरणी कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस ठाण्याबाहेरही जमाव जमला होता.
गावात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता, पोलिस उपअधीक्षक धीरज कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, गंगाधर घावटे आदी उपस्थित होते.
गावात एका व्हॉटस् ॲप ग्रुपवर सकाळी हा आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत झाला होता. त्यावर वाद सुरू झाल्यानंतर ग्रुप अडमीनने मजकूर काढून टाकला. सायंकाळी वाद मिटविण्यासाठी एका घरात दोन गटातील मोजक्या व्यक्तींमध्ये चर्चा सुरु असतांना वाद वाढून हाणामारी झाली. याची माहिती वेगाने पसरून दोन गट जमाव करून मराठी शाळेजवळ एकमेकांसमोर आले. यावेळी धक्काबुक्की होऊन एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.
यात चारजण जखमी झाले. तेथे उभा असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फुटल्या. दुचाकी आडव्या पडल्या. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगविले आणि दोन्हीबाजूच्या लोकांशी चर्चा करून वातावरण शांत केले. मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.