जिल्ह्यात विविध ठिकाणी चार मुलांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST2021-04-03T04:22:01+5:302021-04-03T04:22:01+5:30

कोडोलीतील विहिरीत बुडाल्याने शिवराज कृष्णात साळोखे (वय १४) व शुभम लक्ष्मण पाथरवट (१५ रा. वैभवनगर) याचा मृत्यू झाला तर ...

Four children drowned at various places in the district | जिल्ह्यात विविध ठिकाणी चार मुलांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात विविध ठिकाणी चार मुलांचा बुडून मृत्यू

कोडोलीतील विहिरीत बुडाल्याने शिवराज कृष्णात साळोखे (वय १४) व शुभम लक्ष्मण पाथरवट (१५ रा. वैभवनगर) याचा मृत्यू झाला तर शिंगणापूर चंबुखडी (ता.करवीर) येथील म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या खाणीत बुडून यशराज राजू माळी (वय १६, रा. गणेशनगर, शिंगणापूर) याचा मृत्यू झाला. या ठिकाणी मारुती कस्तुरे (१७) या मुलास वाचविण्यात यश आले.

कोडोली येथील वैभवनगरातील सात ते आठ मुले रंगपंचमी खेळून बामनांच्या मळ्यात गजानन कापरे यांची विहिरीत पोहण्यास गेले होते. विहीर सुमारे तीस ते चाळीस फूट पाणी होते. पाण्यात उडी मारताच शिवराज व शुभम हे पाण्यात बुडू लागले सोबत आलेली मुले घाबरून पळून गेली. त्यांनी घरात सांगितल्यानंतर घरातील व शेजारी विहिरीजवळ गेल्यावर त्यांना विहिरीशेजारी दोघांची चपला कपडे असल्याचे लक्षात आले. तत्काळ नागरिकांनी पाण्यात उडी मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यांचा शोध लागला नाही. कोडोलीचे मंडल अधिकारी व तलाठ्यांनी कोल्हापुरातून व्हाईट आर्मी व कोडोलीच्या गनिमी कावा यांच्या कार्यकर्त्यांनी पाचारण केले. त्यांनी गळाच्या साहाय्याने प्रथम शुभमचा व त्यानंतर शिवराजचा मृतदेह बाहेर काढला. मृत शुभम लक्ष्मण पाथरवट याला आई, भाऊ तर शिवराज साळुंखे याला आई वडील, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

शिंगणापूर येथे राहणारा यशराज माळी हा दहावीत शिकणारा विद्यार्थी होता. मित्रांसोबत तो खाणीत आंघोळीसाठी गेला होता. यशराज व त्याचा सहकारी मारुती कस्तुरे यांना पोहता येत नव्हते. पाण्यात बुडू लागल्यानंतर त्यांच्या मित्रांनी मारुतीला पाण्याबाहेर काढले. या दरम्यान यशराज गाळात रूतल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. यशराजच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले असून पश्चात आई, दोन विवाहित बहिणी आहेत. त्याची आई भाजीपाला विक्री करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवते. एकुलत्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

कुरुंदवाड येथील रंगपंचमी खेळून आंघोळीस गेलेला अकिब यासीन बागवान (वय २४, ढेपणपूर, मशीदजवळ, कुरुंदवाड) याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना कुरुंदवाड-तेरवाड रस्त्यावरील गायकवाड पेट्रोल पंपाच्या मागे असणाऱ्या मालगावे यांच्या विहिरीत घडली. त्यांची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली. अकिबच्या बहिणीचे रविवारी लग्न आहे. शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम घरात होता. तेथे जेवण केल्यानंतर त्याने नातेवाईकांसोबत रंगपंचमी खेळली. त्यानंतर तो त्यांच्यासोबतच पोहण्यास गेला होता. त्याने विहिरीत उडी घेतल्यानंतर तो वर आला नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांनी शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला.

Web Title: Four children drowned at various places in the district