Kolhapur: दारू पिताना हटकले, मद्यपींचा माजी सरपंचाच्या घरावर केला हल्ला; दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 16:55 IST2026-02-13T16:53:07+5:302026-02-13T16:55:06+5:30
पाचजणांवर गुन्हा

Kolhapur: दारू पिताना हटकले, मद्यपींचा माजी सरपंचाच्या घरावर केला हल्ला; दोघे जखमी
कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) येथील पाणंद परिसरात शेतात उघड्यावर दारू पिण्यासाठी बसलेल्या मद्यपींना हटकल्याच्या रागातून त्यांनी माजी सरपंच तुकाराम गणपती पाटील (वय ५८, रा. आंबेवाडी) यांच्या घरावर हल्ला केला. तलवार आणि कोयत्याने हल्ला केल्याने पाटील यांच्यासह त्यांचे भाऊ मारुती गणपती पाटील गंभीर जखमी झाले. हा प्रकार बुधवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी पाच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला.
तुकाराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी हर्षवर्धन शरद सुतार (२५), विशाल सुभाष फाळके (२०, दोघे रा. रजपूतवाडी, ता. करवीर), रजत राजाराम गुरव (२०, रा. पोहाळे, ता पन्हाळा) या तिघांसह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. यातील अल्पवयीन मुलांना बालनिरीक्षणगृहात पाठवले आहे. फिर्यादी आणि आंबेवाडीतील ग्रामस्थांनी केलेल्या प्रतिकारात तीन हल्लेखोर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. फिर्यादी पाटील यांच्या हाताचे बोट तुटले असून, त्यांच्या भावाच्या हातावर आणि पाठीवर खोलवर जखम झाली आहे.
आंबेवाडी येथील पाणंद परिसरातील शेतात दारू पीत बसलेल्या चौघांना फिर्यादी पाटील यांनी रविवारी (दि. ८) दुपारी हटकले होते. याबाबत त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता. तत्पूर्वीच पाचजणांनी पाटील यांच्या घरावर हल्ला करून दहशत माजवली. उपचारानंतर हल्लेखोरांवर अटकेची कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.