Kolhapur: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत 'आबाजी' धनुष्यबाण उचलणार, ‘गोकुळ’सह ‘करवीर’ मतदारसंघात समीकरणे बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:08 IST2026-01-10T12:07:55+5:302026-01-10T12:08:39+5:30
विश्वास पाटील हे गेली अनेक वर्षे कॉंग्रेस सोबत राहिले आहेत

Kolhapur: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत 'आबाजी' धनुष्यबाण उचलणार, ‘गोकुळ’सह ‘करवीर’ मतदारसंघात समीकरणे बदलणार
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील हे आज, शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे. पाटील यांच्या प्रवेशाने ‘गोकुळ’ सह करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
विश्वास पाटील हे गेली अनेक वर्षे कॉंग्रेस सोबत राहिले आहेत. दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख जिल्ह्यात होती. पण, ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशावेळी त्यांनी कॉंग्रेस सोबत राहणेच पसंत केले.
पण, त्यांचे सुपुत्र सचिन पाटील हे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक आहेत. मतदारसंघाची राजकीय गणिते पाहता, शिंदेसेनेचा पर्याय असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या निर्णयाने ‘गोकुळ’ व करवीर मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार हे मात्र निश्चित आहे.
त्यांच्या सोबत शिरोली दुमालाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांच्यासह तालुक्यातील शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. आज, सायंकाळी साडे चार वाजता कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.