कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; ‘आबाजी’ उचलणार धनुष्य, सूर्यवंशी बांधणार घड्याळ; ‘गोकुळ’चे राजकारणावर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:43 IST2025-11-03T17:42:11+5:302025-11-03T17:43:10+5:30
कोल्हापूर : ‘ गोकुळ’ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) व करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी ...

कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; ‘आबाजी’ उचलणार धनुष्य, सूर्यवंशी बांधणार घड्याळ; ‘गोकुळ’चे राजकारणावर होणार परिणाम
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) व करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांनी हाताने ‘धनुष्यबाण’ उचलण्याची तर सूर्यवंशी यांनी हातात ‘घड्याळ’ बांधण्याची तयारी केली आहे. येत्या आठ दिवसात याबाबतची अधिकृत घोषणा होणार असून करवीर तालुक्यासह ‘गोकुळ’च्याराजकारणावर या घडामोडीचा परिणाम होणार हे निश्चित आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी विश्वास पाटील व राजेंद्र सूर्यवंशी यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला. पाटील यांची करवीर तालुक्यात दूध संस्थांच्या माध्यमातून ताकद आहे. ४० वर्षांहून अधिक काळ ते सक्रिय राजकारणात असल्याने त्यांचा प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात गट आहे. त्यामुळे राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तालुक्यातील काँग्रेसची जबाबदारी पाटील यांनी घ्यावी, असा आग्रह आमदार सतेज पाटील यांचा हाेता. पण, त्यांनी सावध भूमिका घेत आपले पत्ते खुले केले नव्हते.
जिल्हा परिषद मतदारसंघांच्या पुनर्रचनेत त्यांचे ‘शिरोली दुमाला’ गाव ‘पाडळी खुर्द’ मतदारसंघात गेले आणि तेथून पाटील यांचे सुपुत्र रयत संघाचे अध्यक्ष सचिन पाटील यांना शड्डू ठोकला. हा मतदारसंघ सुरक्षित करायचा असेल तर हातात धनुष्यबाण घेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
सूर्यवंशी यांनी काँग्रेसकडून याच मतदारसंघातून तयारी केली होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर गळ टाकला असून तेही हातावर घड्याळ बांधणार हे निश्चित आहे.
सांगरूळ मतदारसंघावरही होणार परिणाम
विश्वास पाटील यांचा सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघात दूध संस्थांच्या माध्यमातून संपर्क आहे. त्याचबरोबर राजेंद्र सूर्यवंशी यांनीही येथे काम केल्याने दोघे पाडळी खुर्दमधून एकमेकांसमोर येणार असले तरी त्याचा थेट परिणाम ‘सांगरूळ’च्या राजकारणावर होणार आहे.
गेली अनेक वर्षे व्यक्तिगत पातळीवर काम करत आलो आहे. ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांचा आग्रह आणि आमच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा असल्याने हा निर्णय घेत आहोत. -राजेंद्र सूर्यवंशी