Kolhapur Politics: अखेर ठरलं! राहुल पाटील यांच्या हातात घड्याळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:35 IST2025-07-29T16:34:39+5:302025-07-29T16:35:01+5:30

भोगावती कारखान्यातील संचालकासह प्रवेश करणार

Former Kolhapur Zilla Parishad President Rahul Patil will join the Nationalist Ajit Pawar faction | Kolhapur Politics: अखेर ठरलं! राहुल पाटील यांच्या हातात घड्याळ

Kolhapur Politics: अखेर ठरलं! राहुल पाटील यांच्या हातात घड्याळ

भोगावती : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश निश्चित झाला असून याबाबत सोमवारी भोगावती येथे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. पाटील यांच्यासह भोगावती सहकारी साखर कारखान्यातील काँग्रेसचे संचालकही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राहुल पाटील यांच्या गटाच्या सुकाणू समितीची भोगावती येथे बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागा आम्ही सहजपणे निवडून आणू शकतो. असा विश्वास गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे यांनी व्यक्त केला.

राधानगरी तालुक्यातील भोगावतीच्या काँग्रेसच्या सर्व संचालकांनी राहुल पाटील यांच्यासोबत जाण्यासाठी सुकाणू समिती निर्णय घेईल असे ठरवले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशानंतर गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, बाजार समिती येथे योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशाही भावना यावेळी कार्यकर्त्यांतून व्यक्त करण्यात आली. बैठकीला काँग्रेसचे धीरज डोंगळे-घोटवडे, आनंदराव चौगले, कृष्णराव पाटील, अभिजित पाटील या संचालकासह राधानगरी तालुक्यातील राहुल पाटील गटाचे नेते, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

चौगले, पाटील अनुपस्थित

बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले व कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील यांची अनुपस्थिती राहिली. मात्र, ते ही आमच्या सोबत असतील असा विश्वास यावेळी काही संचालकांनी व्यक्त केला.

‘राहुल पाटील यांना आम्ही एकाकी सोडून राहू शकत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करून भोगावती साखर कारखान्याला शासनाकडून भरीव आर्थिक सहकार्य प्राप्त करून घेऊ. कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ.’-  पी. डी. धुंदरे, माजी संचालक, गोकुळ दूध संघ

Web Title: Former Kolhapur Zilla Parishad President Rahul Patil will join the Nationalist Ajit Pawar faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.