Fighting between two soldiers of the Reserve Battalion | राखीव बटालियनच्या दोन जवानात हाणामारी

राखीव बटालियनच्या दोन जवानात हाणामारी

ठळक मुद्देराखीव बटालियनच्या दोन जवानात हाणामारी दोघेही जवान जखमी : एकमेकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

कोल्हापूर : भारतीय राखीव बटालियनच्या दोन जवानांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. हाणामारीत मनोज संभाजी तळेकर (वय ३०, रा. साईनाथ कॉलनी, लाईन बाजार, कोल्हापूर) व भरत रामचंद्र पाटील (२९, रा. सांगवडे, ता. करवीर) हे दोन्हीही जवान गंभीर जखमी झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भारतीय राखीव बटालियन (आय.आर.बी.)चे येथील कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पिछाडीस जुन्या अधीक्षक कार्यालयात आहे. सोमवारी दुपारी मनोज तळेकर व भरत पाटील या दोघा जवानांमध्ये किरकोळ कारणांवरून हाणामारीचा प्रकार घडला.

भरत पाटील याने केलेल्या हल्ल्यात मनोज तळेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोळ्यानजीक गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना इतर सहकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर पाठोपाठ भरत पाटील हे जवानही उपचारासाठी दाखल झाले.

दोन्हीही जखमी जवानांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दिली असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Fighting between two soldiers of the Reserve Battalion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.