देश-विदेशातील चित्रपटांची मेजवानी उद्यापासून

By Admin | Updated: December 19, 2014 00:11 IST2014-12-18T23:57:46+5:302014-12-19T00:11:32+5:30

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : राजदत्त, सुधीर नांदगावकरांचा होणार सन्मान; ५० चित्रपट, ४० लघुपट

Festival of movies from home and abroad will start from tomorrow | देश-विदेशातील चित्रपटांची मेजवानी उद्यापासून

देश-विदेशातील चित्रपटांची मेजवानी उद्यापासून

कोल्हापूर : तिसरा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शनिवार (दि.२०) ते २७ डिसेंबर या कालावधीत येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. ५० चित्रपट व ४० लघुपटांच्या प्रदर्शनातून हा महोत्सव रंगणार आहे. मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांतील व परदेशी चित्रपटांचा यामध्ये समावेश असेल, अशी माहिती कलामहर्षी बाबूराव पेंटर कलादालनचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत जोशी यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त व ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
जोशी म्हणाले, महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी दक्षिण कोरिया, फ्रान्स, हंगेरी, तैवान, बांगलादेश, रशिया, इराण, जर्मनी, यु.के., जपान, तुर्कस्तान, बेल्जियम, क्रोएशिया या देशांतील विविध चित्रपट दाखविले जाणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरातील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारे तीन चित्रपट, त्यांच्या कारकिर्दीतील पोस्टर्स व चित्रपटातील स्थिरचित्रांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. विविध भारती या विभागामध्ये कोकणी, मल्याळम्, बंगाली, आसामी, तमिळ, कन्नड भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. कंट्री फोकस विभागात चीनमधील तरुण दिग्दर्शकांचे नवीन चित्रपट दाखविले जाणार आहेत. डायरेक्ट फोकसमध्ये ग्रीक दिग्दर्शक कास्टा गॅव्हरास यांचे तीन महत्त्वपूर्ण चित्रपट दाखविले जाणार आहेत.
दिग्दर्शक गुलजार यांच्या गौरवार्थ त्यांनी दिग्दर्शित केलेल्या तीन चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. श्रद्धांजली विभागात ‘कागज के फूल’ हा व्ही. के. मूर्ती यांनी चित्रीत केलेला गुरुदत्त यांचा चित्रपट व ब्रिटिश अभिनेता रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांनी दिग्दर्शित ‘क्लोजिंग द रिंग’ हा चित्रपट दाखविला जाईल. माय मराठी विभागामध्ये ‘बरड’, ‘अग्निपंख’, ‘चिअर्स मराठे’, ‘रझाकार’, ‘कॅँडल मार्च’,‘ कापूस कोंड्याची गोष्ट’ आदींसारखे सात अप्रदर्शित चित्रपट प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी स्पर्धेत असणार आहेत. शनिवारी (दि.२७) महोत्सवाची सांगता होईल.
शनिवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता सिनेअभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर यांना चित्रतंत्र महर्षी कै.आनंदराव पेंटर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तर २३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना अभिनेते दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या हस्ते सिनेमा केसरी कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्काराने सन्मानित करणार आहेत.


ंया चित्रपटांचे आकर्षण
मराठी : अवघाची संसार, धाकटी जाऊ, एक गाव बारा भानगडी
प्रादेशिक भाषा : ओडामंडूम , आर्टिस्ट (मल्याळम्), मद्रास (तमिळ), अपूर पांचाळी (बंगाली), खोप (आसामी).
चिनी चित्रपट : क्लोज टू दसन, कॅमल कलर, सुपर टायफून, सिटी मंकी, द लास्ट एड वूमन.
गुलजार (हिंदी), किताब, अंगूर, अचानक.
होस्ट (दक्षिण कोरियन)

Web Title: Festival of movies from home and abroad will start from tomorrow