अलमट्टीवरुन कोल्हापूर, सांगलीत धास्ती; दिल्लीतील बैठक स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:19 IST2025-05-08T13:18:33+5:302025-05-08T13:19:29+5:30
महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेकडे लक्ष

अलमट्टीवरुन कोल्हापूर, सांगलीत धास्ती; दिल्लीतील बैठक स्थगित
कोल्हापूर : कृष्णा कालवा योजनेंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार सध्या आक्रमक दिसत आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराची धास्ती वाढणार आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी दिल्लीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतील मंत्र्यांची बैठक मंगळवारी होणार होती; पण अचानक बैठक रद्द झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित परिसरात चिंतेचे ढग दाटून आले आहेत.
धरणाची सध्याची उंची ५१९.६ मीटर उंच असून, १२३ टीएमसी पाणी क्षमता आहे. त्याची उंची वाढवून ५२४.२६ करण्यासाठी कर्नाटक सरकारने मान्यता दिली आहे. एक वर्षापासून कर्नाटक शासन केंद्रीय पातळीवरही पाठपुरावा करीत आहे. धरणाची उंची वाढवल्याने पाणी साठवून कर्नाटकातील दोन लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. परिसरातील पिण्याच्या प्रश्न निकालात निघणार आहे. म्हणूनच कर्नाटक सरकार उंची वाढवण्यावर ठाम आहे; पण याचा फटका पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला बसणार आहे.
धरणातील पाणी साठ्याचा फुगवटा वाढल्याने या दोन जिल्ह्यातील नद्यांतील पाण्याच्या विसर्ग गतीने होणार नाही. पूरस्थितीमध्ये भर पडणार आहे. म्हणून धरणाच्या उंची वाढवण्यास या परिसरातील शेतकऱ्यांचा, रहिवाशांचा विरोध आहे; पण विरोध न जुमानता कर्नाटक सरकार उंची वाढवण्यासाठी आवश्यक असलेली १ लाख ३३ हजार ८६७ एकर जमीन संपादनाची प्रक्रिया गतीने करीत आहे.
‘आंध्र’, ‘तेलंगणा’ला दुष्काळाची भीती
अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने पावसाळ्यात पाण्याचा फुगवटा वाढून काेल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराची भीती आहे. याउलट पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी न मिळाल्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांना दुष्काळाचे भय निर्माण झाले आहे.