कोल्हापुरात कुंटणखाने चालवणारी फातिमा देसाई वर्षासाठी स्थानबद्ध; पिटा कायद्यांतर्गत राज्यात पहिलीच कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:14 IST2026-02-13T17:13:59+5:302026-02-13T17:14:34+5:30
वारंवार सूचना देऊनही तिच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट तिने काही पीडित महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण केले.

संग्रहित छाया
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कुंटणखाने चालवून महिलांचे लैंगिक शोषण करणारी फातिमा ऊर्फ मुस्कान विजय देसाई (वय ३३, रा. राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड, कोल्हापूर) हिला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागामार्फत पोलिस अधीक्षकांनी पाठवलेल्या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. पिटा कायद्यांतर्गत झालेली ही राज्यातील पहिलीच प्रतिबंधात्मक कारवाई आहे.
कोल्हापूर शहरासह करवीर आणि पन्हाळा तालुक्यांतील काही लॉज आणि खासगी ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत फातिमा ऊर्फ मुस्कान देसाई हिने कुंटणखाने चालवल्याचे समोर आले. वारंवार सूचना देऊनही तिच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट तिने काही पीडित महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण केले.
तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागातील सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी प्रस्ताव तयार केला होता. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार तो जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पडताळणी करून मंगळवारी (दि. १०) प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानुसार आरोपी देसाई हिला एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक कोल्हाळ आणि सहायक फौजदार सचिन सूर्याजी पाटील यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.
वर्षभर कारागृहाची हवा..
अनैतिक मानवी व्यापार म्हणजे पिटांतर्गत आरोपींना स्थानबद्ध करण्याची कायदेशीर तरतूद यापूर्वी नव्हती. राज्य सरकारने २०२५ मध्ये यात सुधारणा केली. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स गुन्हे, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांसह आता यात अनैतिक मानवी व्यापार आणि जुगार अड्डे चालविणाऱ्यांवरही स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी पिटांतर्गत केलेली ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले. यामध्ये संबंधित महिलेला वर्षभर कारागृहात स्थानबद्ध केले जाते.