Kolhapur: मुलगीला पळवून नेल्याचा राग; जावयावर पोलिस ठाण्यात हल्ला, मुलीसह पोलिस कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:27 IST2026-03-18T19:26:12+5:302026-03-18T19:27:33+5:30
अब्दुललाटच्या एकास अटक

Kolhapur: मुलगीला पळवून नेल्याचा राग; जावयावर पोलिस ठाण्यात हल्ला, मुलीसह पोलिस कर्मचारी जखमी
कुरुंदवाड : मुलगीला फुस लावून पळवून नेल्याच्या रागातून तिच्या पतीवर वडिलाने पोलिस ठाण्यातच कटरने हल्ला केला. मात्र मुलगी पतीला वाचवण्यासाठी आल्याने तिच्या हाताला आणि बोटाला गंभीर इजा झाली. येथील पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदारासमोरच हा जीवघेणी हल्ला झाला. या झटापटीत ठाणे अंमलदारही किरकोळ जखमी झाले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मुलगी प्रज्ञा रमेश कांबळे हिने वडील रमेश रघुनाथ कांबळे (वय ४५, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून आरोपी कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि.१६) रात्री साडेआठच्या सुमारास येथील पोलीस ठाण्यात ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कांबळे यांनी आपली मुलगी प्रज्ञा बेपत्ता असल्याची फिर्याद येथील पोलिसांत दिली होती. सोमवारी सायंकाळी प्रज्ञा पती संकेत शिवगोंडा पाटील दोघे पोलिस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी आरोपी कांबळे यालाही बोलावून घेतले. ठाणे अंमलदार राजेंद्र पोवार दोघांचेही जबाब घेताना कांबळे व पाटील यांच्यात वादावादी झाली.
यातून कांबळे याने मारहाण करत कटर काढून पाटील याच्यावर हल्ला करत असताना प्रज्ञाने वडिलांना अडवले. त्यामुळे कटर प्रज्ञाच्या हाताला आणि बोटाला लागून गंभीर इजा झाली. वाद मिटविण्यासाठी आलेल्या ठाणे अंमलदारालाही कटर लागून किरकोळ दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल चव्हाण करीत आहेत.
अंमलदारासमोरच कटरने हल्ला
ठाणे अंमलदारांसमोर हाणामारी सुरू होऊन रमेश कांबळे कटरने हल्ला करत असताना ठाणे अंमलदार राजेंद्र पोवार धाडसाने संतापलेल्या आरोपी कांबळे याला पकडून कटर काढून घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये ठाणे अंमलदार पोवारही जखमी झाले असले तरी त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.