मुलांचा वाद सोडवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू, दोघांना अटक; कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:43 IST2025-05-26T12:43:02+5:302025-05-26T12:43:18+5:30

कोल्हापूर : मुलांची मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा झटापटीत जमिनीवर पडून मृत्यू झाला. मीरअहमद अब्बास मुल्ला (वय ७५) असे मृताचे ...

Father dies after falling to the ground in a scuffle while trying to resolve a fight between his children in kolhapur | मुलांचा वाद सोडवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू, दोघांना अटक; कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील घटना

मुलांचा वाद सोडवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू, दोघांना अटक; कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील घटना

कोल्हापूर : मुलांची मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा झटापटीत जमिनीवर पडून मृत्यू झाला. मीरअहमद अब्बास मुल्ला (वय ७५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गुलाब मीरअहमद मुल्ला (४५) आणि फिरोज मीरअहमद मुल्ला (३०, तिघे रा. सुतार मळा, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार शनिवारी (दि. २४) मध्यरात्रीच्या सुमारास सुतार मळ्यातील राहत्या घरात घडला.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षतीर्थ वसाहतीमधील सुतार मळ्यात मीरअहमद मुल्ला हे त्यांची पत्नी रुक्साना, तीन मुले, दोन सुना आणि नातवंडांसह राहत होते. मोठा मुलगा गुलाब हा अविवाहित असून, रंगकाम करतो. दोन नंबरचा मुलगा जावेद हा मिळेल ते काम करतो. लहान मुलगा फिरोज हा चित्रपट निर्मिती क्षेत्रात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करतो. मीरअरमद मुल्ला हे शहरातील एका चित्रपटगृहात तिकीट बुकिंग मॅनेजर म्हणून काम करीत होते.

शनिवारी रात्री उशिरा घरात लहान मुले खेळताना आरडाओरडा करीत होते. या रागातून गुलाब हा मुलांच्या अंगावर धावून गेला. यातून गुलाब आणि फिरोज या भावांमध्ये वाद सुरू झाला. दोघांची मारामारी सुरू होताच वडील मीरअहमद आणि आई रुक्साना हे वाद सोडवायला गेले. त्यावेळी झालेल्या झटापटीत मीरअहमद जमिनीवर पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

मुलांनी त्यांना पाणी देऊन झोपविले. मात्र, काही वेळाने त्रास वाढून ते बेशुद्ध पडले. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीराम कणेरकर, उपनिरीक्षक खंडू गायकवाड, हवालदार संजय कोळी यांनी सुतार मळ्यात जाऊन पंचनामा केला. गुलाब आणि फिरोज या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दोघांवर गुन्हा

निष्काळजीपणे झटापट करून वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांनी गुलाब आणि फिरोज या दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत. लहान मुलांमधील वादासह अन्य कारणांचाही शोध सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Father dies after falling to the ground in a scuffle while trying to resolve a fight between his children in kolhapur