Kolhapur: जैनापूर येथे शेतकऱ्यांनी रेल्वेचे काम पाडले बंद, ठेकेदाराला धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:28 IST2025-09-04T18:26:36+5:302025-09-04T18:28:13+5:30
अन्यथा रेल्वे रोखणार : विक्रम पाटील

Kolhapur: जैनापूर येथे शेतकऱ्यांनी रेल्वेचे काम पाडले बंद, ठेकेदाराला धरले धारेवर
जयसिंगपूर : मिरज-कोल्हापूररेल्वे लोहमार्गाचे दोन्ही बाजूला सुरक्षा व अतिक्रमण रोखण्यासाठी सुरु असलेल्या सुरक्षा जाळी उभारण्याचे काम जैनापूर (ता. शिरोळ) येथे शेतकऱ्यांनी बंद पाडले. यावेळी ठेकेदाराला धारेवर धरण्यात आले. तर शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी व रेल्वेच्या हद्दी निश्चित केल्याशिवाय काम सुरू केल्यास रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते विक्रम पाटील यांनी दिला.
पुणे येथील सिनियर डेन (एस) अंतर्गत मिरज-कोल्हापूर विभागातील सुरक्षा व अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या कामाची निविदा पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने जैनापूर येथे कामाला सुरुवात केली आहे. ही बाब जैनापूर व चिपरी येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर जैनापूर येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी धाव घेऊन ठेकेदारावर प्रश्नांची सरबत्ती केली.
रेल्वे कर्मचारी व कामाचा सुपरवायझर यांना शेतीची मोजणी करून हद्द निश्चित करा, रेल्वेच्या हद्द ही शेतकऱ्यांना दाखवा अशी मागणी करीत सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी अमोल संकपाळ, वर्धमान मगदूम, बाहुबली चौगुले, सुरेश शहापुरे, गोपाळसिंग राजपूत, प्रकाश पाटील, तेजपाल पाटील, रवींद्र मगदूम, विठ्ठल जगदाळे, धैर्यशील दळवी, दीपक पाटील, चेतन पाटील, अनिल पाटील, सम्राट दळवी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.