शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी विधान भवनावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:20 IST2025-03-10T12:19:28+5:302025-03-10T12:20:57+5:30

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारा जिल्ह्यांतील शेतकरी एकवटले

Farmers from twelve districts march to Vidhan Bhavan on Wednesday against Shaktipeeth Highway | शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी विधान भवनावर धडक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी विधान भवनावर धडक

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही, असा एल्गार पुकारत बुधवारी (दि. १२) अधिवेशन काळात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विधान भवनावर १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.

आझाद मैदानात सकाळी ९ वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून, राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी येणार असून, कोल्हापुरातून चार हजार शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध दर्शविला होता. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातून वात लागल्याने सत्ताधारी हादरले आहेत. त्यातूनच स्थानिक नेत्यांना पुढे करत महामार्गाला समर्थन असल्याचे ते भासवत असल्याचे फोंडे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी किती शेतकऱ्यांशी चर्चा केली?

शक्तिपीठ महामार्गाला समर्थन असणाऱ्या आमदारांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावीत. महामार्गाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करणार म्हणता मग, गेल्या वर्षभरात किती शेतकऱ्यांशी चर्चा केली, हे सांगावे, असे फाेंडे यांनी म्हटले आहे.

निवडणूक झाल्यानंतर शब्द फिरवला

विधानसभा निवडणुकीत काेल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहून मवाळ भूमिका घेतली. आता निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याचे फोंडे यांनी म्हटले आहे.

उद्योगपतींचे खिशे भरण्यासाठीच महामार्ग

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गापेक्षा शेती व पिण्याला पाणी हवे आहे. मात्र, सरकारने उद्योगपतींचे खिशे भरण्यासाठी महामार्गाचा घाट घातल्याचे फोंडे यांनी म्हटले आहे.

Web Title: Farmers from twelve districts march to Vidhan Bhavan on Wednesday against Shaktipeeth Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.