Kolhapur- दुर्दैवी!, पॉवर टिलरमध्ये सापडून शेतकरी ठार, वाचवायला गेली असता पदर अडकल्याने पत्नीही गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:24 IST2025-06-07T12:22:18+5:302025-06-07T12:24:32+5:30
जखमी पत्नीची प्रकृती चिंताजनक

Kolhapur- दुर्दैवी!, पॉवर टिलरमध्ये सापडून शेतकरी ठार, वाचवायला गेली असता पदर अडकल्याने पत्नीही गंभीर जखमी
गारगोटी: भालेकरवाडी ता.भुदरगड येथे शेतात नांगरट करताना पॉवर टिलरमध्ये सापडून शेतकरी जागीच ठार झाला. मारुती नारायण भालेकर (वय ४५) असे मृताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी शोभा मारुती भालेकर (४०) या पॉवर टिलरचा रोटर उचलण्याच्या प्रयत्नात रोटरमध्ये दोन्ही पाय सापडल्याने गंभीर जखमी झाल्या.
मृत मारुती हे आपल्या पत्नी शोभा यांच्यासोबत शेतात भात लागवडीपूर्वी नांगरट करण्यासाठी पॉवरटेलर घेऊन गेले होते. रोटावेटर बांधाच्या उतारावरून जात असताना अचानक तो त्यांच्या पोटावर पडला. रोटरचे नांगे त्यांच्या पोटात घुसले. ही घटना जवळच असणाऱ्या त्यांच्या पत्नी शोभा यांनी पाहिले. पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचाही साडीचा पदर रोटावेटरमध्ये अडकला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.
त्यांच्यावर सध्या गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे. मृत मारुती यांच्या पश्चात वृद्ध आई, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.