Kolhapur: खासगी प्रयोगशाळेत तपासणी, सीपीआरमधील २१ डॉक्टर दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:20 IST2026-01-05T12:19:54+5:302026-01-05T12:20:23+5:30
अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे, डॉक्टरांनाही लेखी सूचना

Kolhapur: खासगी प्रयोगशाळेत तपासणी, सीपीआरमधील २१ डॉक्टर दोषी
कोल्हापूर : सीपीआरमध्ये अद्ययावत विविध चाचण्यांसाठी प्रयोगशाळा असताना खासगी प्रयोगशाळेतून या चाचण्या करून घेतल्याबद्दल येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या २१ डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची शिफारस चौकशी समितीने केली असून, हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील यांनी गेल्या महिन्यात बाहेरील प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडून सीपीआरमधील हे राजरोस सुरू असलेले प्रकरण उघडकीस आणले होते. यानंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सीपीआरमध्ये बैठक घेऊन संबंधितांची झाडाझडती घेतली होती. यानंतर अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली होती. या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला आहे.
प्रसुतीशास्त्र विभागाच्या प्रमुखांसह त्यांच्या वैद्यकीय पथकाची प्रामु्ख्याने चौकशी करण्यात आली. तेव्हा २१ रुग्णांच्या सीबीसी, एचबीएस एजी तसेच अन्य रक्त तपासण्या खासगी प्रयोगशाळांकडून करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांना दिल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे.
या खासगी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींनी सीपीआरमध्ये येऊन संबंधित रुग्णांचे रक्त घेतले आणि तपासणीचे पैसेही त्यांच्याकडून घेतले. अतिशय अडचणीच्या वेळी या तपासण्या बाहेरून करण्याचा सल्ला दिला जातो, असे यावेळी काही डॉक्टर्सनी सांगितल्यानंतर सीपीआरच्या प्रयोगशाळेच्या प्रमुखांनी आम्ही २४ तास कामावर असतो. येथे चाचण्या करण्यात अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते. हा विरोधाभासही या ठिकाणी पाहावयास मिळाला.
प्रसुती विभागातील बहुतांशी डॉक्टरांवर ठपका
प्रसुती विभागाचे प्रमुख दोन प्राध्यापक, आठ सहयोगी प्राध्यापक, सहा वरिष्ठ निवासी डॉक्टर, दोन वैद्यकीय अधिकारी, सात कनिष्ठ निवासी डॉक्टरांवर चौकशी समितीने ठपका ठेवला आहे.
संबंधित सर्व डॉक्टर्सना यापुढे असा प्रकार खपवून घेणार नसल्याबाबत आणि योग्य ती दक्षता घेण्याबाबत लेखी पत्र दिले आहे. तसेच हा चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. - डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर