सदाची चहागाडी बंद, सर्फराजची हातगाडी थांबली; हातावर पोट असलेल्या लोकांना दगडफेकीचा फटका

By उद्धव गोडसे | Updated: August 24, 2025 13:11 IST2025-08-24T13:09:39+5:302025-08-24T13:11:07+5:30

दगडफेकीचा फटका या परिसरातील सगळ्यांनाच सहन करावा लागला.

Everyone in the area had to bear the brunt of the stone pelting in Kolhapur | सदाची चहागाडी बंद, सर्फराजची हातगाडी थांबली; हातावर पोट असलेल्या लोकांना दगडफेकीचा फटका

सदाची चहागाडी बंद, सर्फराजची हातगाडी थांबली; हातावर पोट असलेल्या लोकांना दगडफेकीचा फटका

उद्धव गोडसे

कोल्हापूर : सिद्धार्थनगर कमानीजवळ शुक्रवारी (दि. २२) रात्री झालेल्या दोन गटातील दगडफेकीनंतर शनिवारी दिवसभर या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. तणावामुळे स्थानिकांना दैनंदिन व्यवहार बंद ठेवावे लागले. यात कमानीजवळची सदाची चहागाडी बंद राहिली, तर याच परिसरात प्लास्टिकच्या वस्तू विकणारा सर्फराज कुरेशी त्याची हातगाडी काढू शकला नाही. या दोघांच्याही चेहऱ्यावर आजच्या कमाईची चिंता स्पष्ट दिसत होती. सदा आणि सर्फराज ही दोन्ही उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. दगडफेकीचा फटका या परिसरातील सगळ्यांनाच सहन करावा लागला.

तरुण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्ताने फलक, डीजेसह विद्युत रोषणाई करण्यात आणि त्याला विरोध करण्यात दोन्हीकडून २५ ते ३० जणांचा सहभाग होता. शुक्रवारी दिवसभर त्यांच्यात तणाव सुरूच होता. रात्री या तणावाचे रूपांतर दगडफेकीत झाले आणि दोन्ही गटातील शेकडो लोकांवर याचा परिणाम झाला. कमानीजवळच्या चहागाडीवरून रोज दोन्ही गटातील लोकांना चहा पाजणाऱ्या सदाची गाडी शनिवारी सकाळी सुरू झालीच नाही. पोलिसांनी त्यांना चहाची गाडी बंद ठेवण्यास सांगितले. त्यामुळे तणावाची स्थिती पाहून सदा जड पावलांनी घराकडे परतले.

सर्फराज कुरेशी हा मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठचा राहणारा असून, दोन वर्षांपासून तो सिद्धार्थनगर परिसरात राहतो. पत्नी आणि दोन मुलांचे पोट भरण्यासाठी तो हातगाडीवरून प्लास्टिकच्या वस्तू विकतो. शनिवारी दुपारी तो धाडस करून हातगाडी काढण्यासाठी गेला. मात्र, बंदोबस्त आणि तणाव पाहून त्याला आपले साहित्य पुन्हा भरून ठेवावे लागले. आजचे काम थांबल्याने पोटापाण्याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

कष्टकऱ्यांना फटका

दिवसभर मालवाहतूक करून आल्यानंतर कमानीजवळ पार्क केलेला इम्रानचा छोटा हत्ती टेम्पो समाजकंटकांनी उलटवून टाकला. संजय, नागेश, सिद्धार्थ यांच्या कारच्या काचा फोडल्या. दगडफेकीनंतर रात्रभर पोलिस बंदोबस्त असल्याने लोकांना घरातून बाहेर पडता आले नाही. आपल्या वाहनांचे काय झाले असेल, या चिंतेत स्थानिकांनी रात्र काढली. सकाळी उठल्यानंतर त्यांना तोडफोड झालेली वाहने लक्ष्मीपुरी पोलिसांनी दुसरीकडे हलवल्याचे समजले. वाहनांमुळे कुटुंबाचे पोटपाणी सुरू होते. आता तेच दंगलखोरांच्या निशाण्यावर आल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या दगडफेकीनंतर शनिवारी दिवसभर तणावाची स्थिती होती. त्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक विक्रेता सर्फराज कुरेशी हा फेरीवाला त्याची हातगाडी सुरू करण्यासाठी धडपडत होता.

Web Title: Everyone in the area had to bear the brunt of the stone pelting in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.