Kolhapur: पीकविमा ठरतोय मृगजळ; गतवर्षीची नुकसानभरपाईही हवेत अन् यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:49 IST2024-08-17T15:49:02+5:302024-08-17T15:49:27+5:30
भरपाई मिळणार तरी कधी?, शेतकरी हवालदिल

Kolhapur: पीकविमा ठरतोय मृगजळ; गतवर्षीची नुकसानभरपाईही हवेत अन् यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना
दत्तात्रय पाटील
म्हाकवे : रुपयात पीकविमा उतरवला; पण पूर ओसरून दहा दिवस उलटले तरीही पूरबाधित पिकांचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे पूरबाधित शेतकऱ्यांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी विवंचनेत सापडलेले आहेत. विमा कंपन्यांकडून पंचनामे कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे, तर वर्षे उलटले तरीही अद्याप गतवर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून पीक संरक्षित करावे. यासाठी गत वर्षांपासून शासनाने एक रुपयात पीकविमा योजना लागू केली. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा उतरवला. परंतु, गेल्यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाईची रक्कम मिळालेली नाही.
यंदा तर कागल तालुक्यातील वेदगंगा व दुधगंगा नदीकाठावरील शेकडो एकरातील उसासह भात, सोयाबीन, भुईमूग पिके कुजून गेली आहेत. यंदा तब्बल १८ दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
दरम्यान, दहा-पंधरा दिवसांनंतर पूरबाधित पिके पुन्हा थोडी फार हिरवी दिसू शकतील, मात्र पुरामुळे ते अशक्त झाल्याने उत्पादकता कमी होणार आहे.
भरपाई मिळणार तरी कधी?
२०२३ खरीप हंगामात रामचंद्र दत्तू गोते (आनूर क्षेत्र अंदाजे ६० गुंठे), सुभाष भाऊ चौगुले (आनूर क्षेत्र अंदाजे ८४ गुंठे),लक्ष्मीबाई बाळाराम पाटील (म्हाकवे ३० गुंठे) यांनी गतवर्षी पीकविमा उतरवला होता; परंतु, नुकसान होऊनही भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कागलमधील चार टक्केच शेतकरीच पात्र
गत २०२३ खरीप हंगामात कागलमधील १५७० शेतकऱ्यांनी २८९९ विमा अर्ज दाखल केल्याने ९१३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. मात्र, केवळ ६० म्हणजे अवघ्या चार टक्के शेतकऱ्यांनाच पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. अद्याप या शेतकऱ्यांच्या हातात भरपाईची रक्कम आलेली नाहीच तर उर्वरित शेतकरी भरपाईसाठी पात्र होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
विमा प्रतिनिधी आहेत तरी कुठे?
यंदाच्या २०२४ खरीप हंगामात २१७० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी ५०४५ अर्ज दाखल करून एक हजार ३१५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ८-१० दिवसापूंर्वीच शेतावर जाऊन नुकसानीची ऑनलाइन तक्रार दाखल केली. मात्र, विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी अद्यापही फिरकलेलाच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.