कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातील विसर्ग कायम असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा (३९ फूट) पातळी ओलांडून धोका पातळीवर गेल्याने कोल्हापूरकरांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर केर्ले-केर्ली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक जोतिबा मार्गे वळवण्यात आली आहे. कोल्हापूर मधून कसबा बावडा मार्गे शियेला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूर, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १३९ प्राथमिक व माध्यमिक शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या.गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी दिवसभर धुवांधार पाऊस कोसळला. सर्वच तालुक्यांना अक्षरश: झोडपून काढले. मंगळवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. मात्र, बुधवारी सकाळपासून जोर काहीसा ओसरला. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या, तरी तुलनेत तीव्रता कमी झाली आहे. धरण क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून, उर्वरित तीन दरवाजांतून प्रति सेकंद ८६४० घनफूट तर दूधगंगेतून १८ हजार ६०० व वारणातून २९ हजार ८०७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला असला, तरी नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी ४२ फुटांवरून वाहत असून, धोका पातळीकडे वाटचाल सुरू असल्याने नदी, ओढ्याकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे.तालुकानिहाय शाळा बंद -गगनबावडा - ४६, पन्हाळा - ३४, राधानगरी - ३०, शाहूवाडी - १५, भुदरगड - ९, करवीर - ५
जिल्ह्यातील ४० कुटुंबे बाधितजिल्ह्यात पुरामुळे ४० कुटुंबांतील १७६ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्याचबरोबर दक्षता म्हणून संबंधित कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एस. टी.च्या ६० फेऱ्या रद्दपुराचे पाणी रस्ते, बंधाऱ्यावर आल्याने एस. टी. महामंडळालाही फटका बसला आहे. दहा राज्य तर २९ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत. दिवसभरात ६० फेऱ्या रद्द झाल्या आहेत.अलमट्टीतून अडीच लाखांचा विसर्गकोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने अलमट्टीच्या विसर्गाकडे लक्ष केंद्रित केले आहे. हिप्परगी धरणातून प्रति सेकंद १ लाख २५ हजार ९६१ तर अलमट्टी धरणातून अडीच लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पडझडीत ५३ लाखांचे नुकसानजिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १३० खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ५३ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.