Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:25 IST2025-06-18T19:25:19+5:302025-06-18T19:25:19+5:30

गडहिंग्लज : पावसात बकरी चारून गारठलेल्या नवऱ्याला चहा बनवताना अंगावर दगड-मातीची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू ...

Elderly man dies after wall collapses due to rain in Gadhinglaj taluka kolhapur | Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले

Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले

गडहिंग्लज : पावसात बकरी चारून गारठलेल्या नवऱ्याला चहा बनवताना अंगावर दगड-मातीची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जनाबाई संतू पाटील (वय ६५, रा. कडाल) असे तिचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे गडहिंग्लज तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून घराचेही साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी, कडाल येथे संतू बापू पाटील हे वीटा-मातीच्या दोन खोल्यांच्या जुन्या घरात पत्नी जनाबाईसह राहतात. परंतु, महिनाभरातील पावसामुळे घराची पूर्वेकडील भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे शेजारील यशवंत पाटील यांच्या घरात तात्पुरते रहायला जाणार होते.

आपल्या घराच्या डागडुजीसाठी पत्रे व लोखंडी अँगल इत्यादी साहित्य आणून दारात ठेवले होते. पाऊस वाढल्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्य पाण्याच्या ढकलगाड्यातून हलवायला सुरुवात केली होती. भांडी-कुंडीसह काही साहित्य अद्याप जुन्या घरातच होते.

दरम्यान, सोमवारी बकरी चारायला गेलेले संतू हे सायंकाळी घरी परतले. त्यांच्यासाठी चहा बनविताना पाठीमागची भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. मातीच्या कच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यामुळे त्यांच्या दोन्ही पायाला, हातांना, छातींना व डोक्याला गंभीर दुखापत झाली.

आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रात्री पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई असा परिवार आहे.

वृद्धापकाळातील आधार हरपला

जनाबाईचे पती संतू हे गिरणी कामगार आहेत. संपामुळे मिल बंद पडल्यामुळे ते मुंबईहून गावी आले. शेतीबरोबरच चार बकरीही त्यांनी पाळल्या होत्या. एकमेकांच्या आधाराने वृद्धापकाळ व्यथित करताना काळाने त्यांचा आधार हिरावून घेतला.

पाय तुटल्याने अत्यवस्थ

३ फूट रुंदीची भिंत छतापासून कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे धावून गेलेले पोलिस पाटील, तानाजी पाटील, सयाजी पाटील, शिवाजी पाटील यांनी पत्र्याचा ट्रंक व मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जनाबाईंना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. परंतु, गुडघ्याखालील पाय तुटल्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन त्या अत्यवस्थ बनल्या होत्या.

Web Title: Elderly man dies after wall collapses due to rain in Gadhinglaj taluka kolhapur