Kolhapur: सर्किट बेंचमध्ये नोकरीच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक, जिल्हा न्यायालयातील शिपायावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:55 IST2025-12-24T11:52:25+5:302025-12-24T11:55:53+5:30
नियुक्ती पत्रावर जिल्हा न्यायालयाचा शिक्का

Kolhapur: सर्किट बेंचमध्ये नोकरीच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक, जिल्हा न्यायालयातील शिपायावर गुन्हा
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचमध्ये वाहन चालक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील शिपाई अमर बळवंत सुतार (रा. साईप्रसाद कॉलनी, राजोपाध्येनगर, कोल्हापूर) याने एका तरुणाची साडेआठ लाखांची फसवणूक केली. त्याने दिलेल्या बनावट नियुक्तीपत्राचा प्रकार सोमवारी (दि. २२) उघडकीस आला. विजय शिवाजी ज्वारे (वय ४७, रा. साईप्रसाद कॉलनी, राजोपाध्येनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी (दि. २३) सुतार याच्यावर गुन्हा दाखल केला.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयात शिपाई पदावर काम करणारा अमर सुतार आणि फिर्यादी ज्वारे यांची तोंडओळख होती. तीन महिन्यांपूर्वी त्याने ज्वारे यांच्या मुलाला सर्किट बेंचमध्ये वाहन चालक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी साडेतीन लाखांची मागणी केली. त्यानुसार त्याने साडेतीन लाख रोख घेतले. त्यानंतर काही दिवसांनी स्वत:च्या आर्थिक अडचणींचे कारण सांगून वेळोवळी ऑनलाइन पद्धतीने पाच लाख रुपये घेतले. गेल्या महिन्यात त्याने ज्वारे यांच्या मुलाच्या नावे बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यावर २२ डिसेंबर रोजी सर्किट बेंचमध्ये हजर राहण्याचा आदेश दिला होता. तसेच, जिल्हा न्यायालयाचा शिक्का होता.
नियुक्तीपत्रानुसार ज्वारे यांचा मुलगा सोमवारी सकाळी सर्किट बेंचमध्ये हजर होण्यासाठी गेला असता, पत्र पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना शंका आली. नियुक्ती पत्रावर जिल्हा न्यायालयाचा शिक्का असल्याने अधिकाऱ्यांनी ज्वारे यांना जिल्हा न्यायालयात पाठवले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही केली.
सर्वच अचंबित
बनावट नियुक्तीपत्र पाहताच सर्किट बेंचमधील प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा न्यायालयातील अधिकाऱ्यांसह न्यायाधीश अचंबित झाले. सुतार हा गेल्या आठ महिन्यांपासून कामावर नाही. त्याला कामावर हजर राहण्याचे पत्र न्यायालयाने दिले होते. तरीही तो कामावर हजर राहिला नाही. त्याने आणखी काही लोकांची फसवणूक केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
शनिवारपासून मोबाइल बंद
सुतार हा शनिवारपर्यंत फिर्यादींच्या संपर्कात होता. त्यानेच शनिवारी सायंकाळी फोन करून फिर्यादींच्या मुलास सोमवारी सर्किट बेंचमध्ये हजर होण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाइल स्विचऑफ झाला. त्याच्या पत्नीचाही मोबाइल बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.