कोल्हापूर : कोल्हापूर येथे विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली, त्या ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण व्हावे, ही कोल्हापूरकरांची दीर्घकालीन मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला असून, मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते आज कोल्हापूर विमानतळावरील नव्याने उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याचबरोबर ‘स्टार एअर’च्या कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचाही शुभारंभ झाला.कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, भाविप्रा सदस्य (ANS) एम. सुरेश, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, विमानतळ संचालक अनिल ह. शिंदे उपस्थित होते.राज्यातील कोल्हापूरसह पुणे, संभाजीनगर आणि नवी मुंबई विमानतळांचे नामकरण करण्यासाठीचे प्रस्तावही केंद्र सरकारकडे प्राप्त झाले असून, त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान एटीसी टॉवरमध्ये विमानतळ संचालक श्री. शिंदे यांनी सद्यस्थितीतील सुविधा, चालू असलेली कामे, धावपट्टीच्या विस्तारीकरणासंदर्भातील प्रगती, आवश्यक भूसंपादन, तसेच नियोजित कामांविषयी सादरीकरण केले. भविष्यात विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारपासून विमानतळापर्यंतचा रस्ता चौपदरी करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर विमानतळाची स्थापना १९३९ साली झाली असून, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. नागरी विमान वाहतुकीतील एक महत्त्वाचा भाग म्हणून या विमानतळाचा समावेश करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी विमानतळाचे उद्घाटन झाले. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २५६ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यात धावपट्टी आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे. ‘उडान’ प्रकल्पातून देशभरात ६२५ नवीन मार्ग सुरू झाले असून, सुमारे दीड कोटी प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. खड्डा भरण्यासाठी ३२४ कोटी रुपये निधी लागणार आज उद्घाटन झालेल्या ४५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या एटीसी टॉवरमुळे कोल्हापूर विमानतळाला आवश्यक तांत्रिक सुविधा प्राप्त झाल्या आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेता, १९०० मीटर असलेली धावपट्टी प्रथम टप्प्यात २३०० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ही धावपट्टी ३,००० मीटरपर्यंत वाढवण्याचा समावेश डीपीआरमध्ये करण्यात आला आहे. आवश्यक ६४ एकरपैकी ६० एकर भूसंपादन पूर्ण झाले असून, उर्वरित भूसंपादन लवकरच पूर्ण होणार. नवीन धावपट्टीच्या भागातील २८ लाख क्युबिक मीटर खड्डा भरण्यासाठी ३२४ कोटी रुपये निधी लागणार आहे.फ्लाइट ट्रेनिंगसाठी एफटीओ सुरु करणारतसेच, कोल्हापूर विमानतळावर फ्लाइट ट्रेनिंगसाठी एफटीओ (फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई एव्हिएशन सेंटरमार्फत सर्वेक्षण सुरू झाले आहे. याशिवाय, विमान देखभाल-दुरुस्ती आणि कार्गो सेवा सुरू करण्यासाठीही प्रक्रिया सुरू आहे. येत्या काळात कार्गो सेवा आणि तीन हजार मीटर लांब धावपट्टीतून पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरहून नागपूरला ४९ प्रवाशी गेलेनागपूरहून आज ४२ प्रवाशी कोल्हापूर विमानतळावर उतरले तर कोल्हापूर हून नागपूरला ४९ प्रवाशी गेले. आज नागपूरला निघालेल्या पहिल्या विमानाला उपस्थित मान्यवरांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तत्पूर्वी नागपूर प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशास यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ यांनी तिकिटाचे वितरण केले.