लाचप्रकरणी घुणकीच्या तत्कालीन तलाठ्यास शिक्षा

By Admin | Updated: July 7, 2015 01:19 IST2015-07-07T01:19:50+5:302015-07-07T01:19:50+5:30

दोषारोपपत्र सिद्ध

Education of the bribe | लाचप्रकरणी घुणकीच्या तत्कालीन तलाठ्यास शिक्षा

लाचप्रकरणी घुणकीच्या तत्कालीन तलाठ्यास शिक्षा

कोल्हापूर : सातबारा खाते उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेतल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने घुणकी (ता. हातकणंगले) येथील गावचावडीतील तत्कालीन तलाठी सुभाष पांडुरंग जाधव (वय ४१, रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा) याला एक वर्ष सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश के. डी. बोचे यांनी सोमवारी सुनावली. दरम्यान, संशयितजाधव याने दंडाची रक्कम भरून वकिलातर्फे जामीन दिल्याने न्यायालयाने त्याची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.
फिर्यादी जावेद शमशुद्दीन मुल्ला (३२ रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले) यांचे आजोबा अब्दुल रसूल मुल्ला यांची मौजे चावरे गावी हजरत पीर देवस्थानचे भूमापन गट क्रं. ३९६ मध्ये जमीन आहे. दि. ७ डिसेंबर १९९६ रोजी आजोबाचे निधन झाले. त्यामुळे वारस म्हणून वडील शमशुद्दीन मुल्ला यांचे नाव खातेउताऱ्यावर नोंद करण्यासाठी त्यावेळच्या तलाठ्यांकडे अर्ज केला. जावेद हे वडिलांचे नाव नोंद झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी २३ जून २००६ रोजी घुणकी गावचावडीमध्ये गेले. यावेळी तलाठी सुभाष जाधव यांनी वारस नोंदणीसाठी २ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर जावेद यांनी २८ आॅगस्ट २००६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सापळा रचला. जावेद यांनी तलाठी जाधव यांची घुणकी गावचावडीमध्ये भेट घेतली. ठरलेल्यापैकी पाचशे रुपयांची जावेदकडून घेताना पोलिसांनी जाधव याला रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक वसंतराव बागल यांनी तपास पूर्ण करून दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यात सरकारतर्फे वकील दिलीप मंगसुळे यांनी फिर्यादी जावेद मुल्ला, पंच पांडुरंग नेरर्लेकर, तत्कालीन इचलकरंजी विभागाचे प्रांताधिकारी वाय. ए. पोमण व पोलीस निरीक्षक बागल आदी साक्षीदार तपासले. खटल्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

Web Title: Education of the bribe