उदगाव : उदगांव (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानीच्या पॅनेलकडून निवडून आलेल्या कलिमुन नदाफ यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने उदगावमध्ये सत्तांतर झाले आहे. ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होणार आहे, अशी माहिती समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सभापती सासणे म्हणाल्या, यड्रावकर गट व काँग्रेस व शिवसेना अशी एकत्र महाविकास आघाडी करून आम्ही निवडणूक लढविली होती. त्यात आठ तर विरोधी ‘स्वाभिमानी’कडे नऊ जागा होत्या. ‘स्वाभिमानी’च्या कलिमुन नदाफ यांनी महाविकास आघाडीला विकासकामांसाठी पाठिंबा दिला आहे.
यावेळी राजेंद्र मगदूम, बाबूराव पाटील, ग्रा. पं. सदस्य हिदायत नदाफ, कुबेर मगदूम, बाळासाहेब कोळी, बाचू बंडगर, अमोल माने, अमोल मगदूम यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
----------
कोट - लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रभागाचा विकास व बेघर वसाहतीच्या मिळकती सिटी सर्व्हेला नोंद करून देणे या दोन आश्वासनांवर आपण महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे.
- कलिमुन नदाफ, ग्रामपंचायत सदस्य
------------
कोट - नदाफ यांना आम्ही स्वाभिमानाने निवडून आणले आहे. त्यांचे मन वळविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला जनतेने कौल दिला आहे. येत्या आठ दिवसांत काहीही घडू शकते.
- सावकर मादनाईक, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना.