Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती

Harbhajan Singh on Test Cricket: दोन ते तीन दिवसांत संपणाऱ्या कसोटी सामन्यांवरही मांडले रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:04 IST

Open in App

Harbhajan Singh on Test Cricket | रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: 'भारतात कसोटी क्रिकेटसाठी चांगल्या खेळपट्टया तयार करण्याची गरज आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावल्या. यासाठी खेळपट्ट्यांचा खराब दर्जा कारणीभूत ठरला. मालिकेतील सर्व सामने जेमतेम अडीच-तीन दिवसांत संपले. जर असेच सुरू राहिले तर कसोटी क्रिकेटला काहीच फायदा होणार नाही', असे रोखठोक मत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने व्यक्त केले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ५३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दी लिजेंड क्लबच्या वतीने सीसीआय येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये हरभजनने आपले मत व्यक्त केले. यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचीही विशेष उपस्थिती राहिली होती. कसोटी क्रिकेटविषयी हरभजन म्हणाला की, 'कसोटी क्रिकेटला प्राधान्य दिले पाहिजे. पाच दिवस चालणाऱ्या सामन्यांमध्ये खरी स्पर्धा पाहायला मिळते. पण, सध्या सामने तीन दिवसांत संपतात. त्यामुळे कसोटीला त्याचा काहीच फायदा नाही. टी-२० क्रिकेटपटू कधीच कसोटी सामना चांगल्या प्रकारे खेळू शकणार नाही. परंतु, एक कसोटीपटू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत चांगल्या प्रकारे खेळू शकतो; कारण त्याचे तंत्र भक्कम असते.'

कसोटीतील भारताच्या खराब संघ कामगिरीसाठी हरभजनने व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि कर्णधार यांनाही जबाबदार धरले. त्याने म्हटले की, 'विदेशी संघांना फिरकीविरुद्ध अडचणी येतात म्हणून संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या सूचनेनुसार फिरकीस पोषक खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या. मात्र, या खेळपट्टयांवर भारताचे फलंदाजच चाचपडले. त्यांना चेंडूंचा अंदाजच आला नाही. विदेशी गोलंदाजांनाही आपला चेंडू कधी आणि कसा वळेल, याचा अंदाज बांधता आला नाही. मुख्य अडचण ही खेळपट्टीची आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पाच दिवस रंगणाऱ्या खेळपट्ट्या तयार करणे महत्त्वाचे आहे.'

English
हिंदी सारांश
Web Title : Need good Test pitches, or else...; Bhajji expresses fear

Web Summary : Harbhajan Singh emphasizes the need for better Test pitches in India, citing recent home series losses. He fears that short Test matches will diminish the format's value. He also held management, coaches, and captains responsible for preparing spin-friendly pitches that backfired on Indian batsmen.
टॅग्स :हरभजन सिंगभारतीय क्रिकेट संघ