कोल्हापुरात विद्यार्थ्याच्या दप्तरात ई सिगारेट, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पालकमंत्रीही अवाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 19:23 IST2025-05-27T19:22:49+5:302025-05-27T19:23:06+5:30
कोल्हापूर : शहरातील खरी कॉर्नर परिसरातील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या दप्तरात ई सिगारेट सापडल्याची वस्तुस्थिती जिल्हा ...

कोल्हापुरात विद्यार्थ्याच्या दप्तरात ई सिगारेट, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पालकमंत्रीही अवाक
कोल्हापूर : शहरातील खरी कॉर्नर परिसरातील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या दप्तरात ई सिगारेट सापडल्याची वस्तुस्थिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सांगितले आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे देखील अवाक झाले. जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीदरम्यान यामुळे वातावरण बदलले आणि याबाबत चिंता व्यक्त करताना उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली.
माध्यमिक शिक्षण विभागाचा आढावा सुरू असताना पालकमंत्र्यांनी माध्यमिक शाळांची अवस्था पाहिल्यानंतर काही गोष्टींबाबत त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. तंबाखुमुक्त शाळा धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना पालकमंत्री करत असतानाच डॉ. आंबोकर यांनी हा प्रकार सांगितला. याच शाळेतील काही मुलांच्या खिशात हजार, दीड हजार रूपये सापडले. त्यांच्या पालकांना बोलावून विचारणा केली असता आम्ही पैसे दिले नव्हते. यांच्याकडे पैसे कुठून आले. आम्हालाही माहिती नसल्याचे सांगितले.
हे ऐकल्यानंतर मात्र पालकमंत्र्यांनी अशा परिस्थितीत आपल्या सर्वांचीच जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, व्यसनविरोधी वातावरण तयार करण्यासाठी मेळावे घ्या. मुलांना, पालकांना बोलवा. या क्षेत्रातील समुपदेशकांना निमंत्रित करा. याच वयात मुलांना काही चांगल्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक सांगितल्या पाहिजेत. पालकही मुले शाळेला गेलीत म्हणून निवांत राहतात. त्यांनाही जबाबदारीची जाणीव करून द्या.
पानपट्टीवाल्यांना हात करून जातात
आबिटकर म्हणाले, शाळांच्या १०० मीटरच्या आवारात तंबाखू विक्री असू नये असा शासनाचा नियम आहे. परंतु अनेक शिक्षकच पानपट्टीवाल्याला हात करत ‘कसं काय बरं हाय का’ असे विचारत जातात. हे बरोबर नाही. याबाबत ठोस काही तरी कृती कार्यक्रम करा अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.