Kolhapur: 'केशवराव'चे काम, किती महिने थांब; दुसरा टप्पा अजून कागदावरच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:48 IST2025-03-29T17:48:25+5:302025-03-29T17:48:49+5:30
इंदुमती गणेश कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरामदायी कामकाज पद्धतीमुळे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे ९ ऑगस्टला उदघाटन हे सध्यातरी दिवास्वप्न ...

छाया-आदित्य वेल्हाळ
इंदुमती गणेश
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरामदायी कामकाज पद्धतीमुळे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे ९ ऑगस्टला उदघाटन हे सध्यातरी दिवास्वप्न झाले आहे. शाहू महाराजांची आठवण म्हणून या वास्तूबद्दल कलाकारांची, कोल्हापूरकरांची आत्मियता लक्षात घेऊन तरी शासकीय काम सहा महिने थांब ही म्हण या बाबतीत खरी करण्याची आवश्यकता नव्हती. पण वास्तूच्या फेज २ आणि फेज ३ बद्दल दुर्दैवाने हाच वाईट अनुभव येत आहे.
कोल्हापूरच्या कलापरंपरेचा आणि कलासक्त राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ८ ऑगस्टला आगीत भस्मसात झाले. याचे चटके आणि झळ सर्वांच्या जिव्हारी लागल्याने शासन, महापालिका, जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूरकरांनी मिळून वर्षभरात वास्तू नव्याने पूर्वी होती त्या दिमाखात उभारण्याचा संकल्प केला.
देशातील नामांकित अशा स्ट्रक्टवेल कंपनीने याची जबाबदारी घेतली, आचारसंहितेपूर्वी पहिल्या टप्प्यातील निविदा मंजूर झाली. मलब्यामुळे तीन महिने काम करता आले नाही तरी तरीही कंपनीने पहिला टप्पा वेगाने पुढे नेला. पण महापालिकेकडून ज्या वेगाने तांत्रिक बाजूंनी सहकार्य अपेक्षित आहे ते होत नसल्याने ९ ऑगस्टपूर्वी नाट्यगृहाचे काम संपणार नाही.
दुसऱ्या टप्प्याच्या स्क्रुटिनीला महिना..
केशवरावच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा ७ तारखेला निघाली. त्यानंतर गेली तीन आठवडे फक्त कॉन्ट्रॅक्टरची स्क्रुटिनी करण्यात महापालिकेने वेळ घालवला आहे. एका प्रस्तावाची फाइल महापालिकेकडे गेली की प्रत्येक टेबलवर ती फाइल एक आठवडा असते. असे किमान चार टेबल धरले तर एक महिना यातच जातो. केशवरावच्या प्रत्येक बाबतीत कर्मचारी आणि संबंधित यंत्रणेकडून असा वेळखाऊपणा केला जात आहे. बरं महापालिकेच्याच यंत्रणेची तक्रार प्रशासकांकडे कशी करायची हाही प्रश्न आहे.
तिसऱ्या टप्प्याची निविदाच नाही..
केशवरावचे काम ९ ऑगस्टपूर्वी संपवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया आणि सर्व प्रकारच्या तांत्रिक बाजूंची मान्यता तातडीने करून हवे आहे. पण महापालिकेकडून आरामदायी, आपल्या सोयीने, जमेल तसे अशा शासकीय मानसिकतेतून काम सुरू आहे. त्यामुळे ९ ऑगस्टला केशवरावमध्ये शुभारंभाचा प्रयोग होणे अवघड आहे. महापालिकेने वेग वाढवला, ठेकेदाराने मनावर घेतले, अधिक मनुष्यबळ वापरले तरच ते शक्य आहे.
टप्पे आणि काम
फेज १ : वास्तूचे जतन संवर्धन (७.२० कोटी)
फेज २ : आर्किटेक्चरल काम, इंटिरिअर डिझाइन, ऑडिटोरिअम (४ कोटी)
फेज ३ : रंगमंच, लायटिंग, ड्रेपरी, मेकअप रुम, साऊंड सिस्टिम. (१९ कोटी )
फेज ४ : मूलभूत सोयी-सुविधा, ड्रेनेज, सुशोभीकरण, पार्किंग (२० कोटी)
केशवरावचे काम प्राधान्याने करण्यावरच भर आहे. पण निविदा प्रक्रिया, त्याची स्क्रुटिनी, ऑडिट अशा गोष्टींना वेळ लागत आहे. तरीही महापालिकेच्या पातळीवर यात सुधारणा करून लवकरात लवकर तांत्रिक बाबू पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. - नेत्रदीप सरनोबत , शहर अभियंता