Kolhapur flood: वीस हजार लिटर दूध घरात, दोन हजार क्विंटल भाजीपाला शिवारात; शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:37 IST2025-08-22T12:35:05+5:302025-08-22T12:37:28+5:30
सात आगारांतून एसटीच्या १५५ फेऱ्या रद्द

Kolhapur flood: वीस हजार लिटर दूध घरात, दोन हजार क्विंटल भाजीपाला शिवारात; शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
कोल्हापूर : जिल्ह्यातील नद्यांना महापूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात २० हजार लिटर दूध घरात तर रोज दोन हजार क्विंटल भाजीपाला शिवारात राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे पिके पाण्याखाली असल्याने ती खराब होण्याची भीती असताना दूध, भाजीपाल्याची वाहतूक थांबल्याने दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प आहे. त्याचा रहदारीवर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर दूध व भाजीपाला वाहतुकीला अडचणी येत आहेत.
वाचा - पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरु
गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात दूध वाहतुकीची अडचण आहे. ‘गोकुळ’ दूध संघाचे गेल्या तीन दिवसांत १६ हजार लिटर तर इतर दूध संघांचे सुमारे ४ हजार असे २० हजार लिटर दूध घरातच राहिले आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याची आवकही घटली असून कोल्हापूर बाजार समितीत मागील गुरुवारी (दि. १४) ३२०० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. मात्र, या आठवड्यात आवक निम्म्यावर आली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांबरोबर बाजार समितीलाही बसला आहे.
बल्क कुलर फुल्ल..!
‘गोकुळ’च्या वतीने अनेक ठिकाणी बल्क कुलर बसवले आहेत. पण, गेल्या दोन दिवसांत पुराच्या पाण्यामुळे दुधाची उचल न झाल्याने बल्क कुलर फुल्ल झाल्याचे समजते.
सात आगारांतून एसटीच्या १५५ फेऱ्या रद्द
अतिवृष्टीचा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसला आहे. गेल्या चार दिवसांत १९ लाख ३९ हजार ३३६ रुपयांचा तोटा झाला आहे. तर गुरुवारी कोल्हापूर विभागाच्या सात आगारांतून विविध मार्गांवरील १५५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.