Kolhapur Crime: दारूड्या नवऱ्याचा चाकूने वार करून खून, पत्नीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:17 IST2025-05-09T16:15:25+5:302025-05-09T16:17:10+5:30
गडहिंग्लज : दारू पिऊन सतत भांडणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यावर पत्नीने रागाच्या भरात चाकूने वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रमेश रावसाहेब ...

Kolhapur Crime: दारूड्या नवऱ्याचा चाकूने वार करून खून, पत्नीला अटक
गडहिंग्लज : दारू पिऊन सतत भांडणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यावर पत्नीने रागाच्या भरात चाकूने वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रमेश रावसाहेब मोरे (वय ४०, रा. लिंगनूर कानूल, ता. गडहिंग्लज), असे मृताचे नाव आहे. प्रणिता रमेश मोरे (३५) हिला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लिंगनूर येथील रमेश मोरे हा गवंडीकाम करीत होता. दारूच्या व्यसनामुळे तो पत्नीकडे सतत पैसे मागत असे. अलीकडे काही कामधंदा करत नव्हता, घरी पैसेही देत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत असत. रमेशचा लहान भाऊ उमेश हा कामानिमित्त कागलला राहतो. आई त्याच्याकडे गेली होती. अलीकडेच लग्न झालेली मुलगी सासरी असून, मुलगा केदार हा यात्रेनिमित्त करंबळीला गेला होता.
गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास रमेश हा दारू पिऊन घरी आला व जेवून झोपला. दरम्यान, भांडी घासत असताना शिवीगाळ करून त्याने प्रणितासोबत भांडण काढले. प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रणिताने रागाच्या भरात घरातील सुरीने त्याच्या गळ्यावर वार केल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सहकाऱ्यांसह लिंगनूरला धाव घेतली. स्वयंपाकगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेशला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे नेले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी डीवायएसपी रामदास इंगवले यांनीही भेट दिली. नातेवाइकांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कारणांचा शोध सुरू
रमेश हा प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करीत असताना झटापटीत आपल्या हातातील सुरी त्याच्या गळ्याला लागली. जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केलेला नाही, असे सांगितल्यामुळे पोलिसांनी प्रणिताला ताब्यात घेतले आहे. वेगळे काही कारण आहे का, याचीही चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि मोबाइलमधील तांत्रिक माहितीवरून तपासाला दिशा मिळेल, असे पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.