कोल्हापूर महापालिकेत आमची चाल कासवाची असेल, पण..; मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:25 IST2025-09-26T12:23:23+5:302025-09-26T12:25:32+5:30
अश्वमेधाचा घोडा सोडलाय

कोल्हापूर महापालिकेत आमची चाल कासवाची असेल, पण..; मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा
कोल्हापूर : जागावाटपाचे मतभेद एकदिलाने सोडवू; पण महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रितच लढवू, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पक्षाच्या पूर्वतयारी बैठकीत दिली. आमची चाल कासवाची असली तरी आम्हाला दुर्लक्षित करू नका, असा इशाराही मुश्रीफ यांनी यावेळी दिला.
मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी राजेश पाटील, राहुल पाटील, रणजीत पाटील, अरुण डोंगळे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या कोल्हापूर महापालिकेतील जागा वाटपांबाबत मुश्रीफ यांनी थेट भाष्य केले.
ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढेल. वाद, मतभेद निर्माण होऊ नयेत, यासाठी चर्चा करू, ज्याठिकाणी शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती करू; पण महापौर, नगराध्यक्ष महायुतीचेच होतील, महापालिका आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
..तर वेगळा मार्ग लढावा लागेल
राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या २० वर्षांपासून महापालिकेत सत्तेत आहे. त्या दोन्ही पक्षांनाच शहरात त्यांची ताकद जास्त वाटत असेल, तर आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल. ज्याठिकाणी आमचा पालकमंत्री नसेल त्याठिकाणी आमचा संपर्कमंत्री बसून जागा वाटपाची चर्चा करील, असेही त्यांनी जाहीर केले. सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूरसाठी संपर्कमंत्री म्हणून स्वत: चर्चा करू, असे मुश्रीफ म्हणाले.
जेसीबी, बुलडोझरचे दहा हत्तींचे बळ
राजेश पाटील, राहुल पाटील, रणजीत पाटील, अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जेसीबी, बुलडोझरचे दहा हत्तींचे बळ पक्षाला मिळाले आहे. ही शक्ती आमच्या पाठीशी आल्याने आम्ही महापालिकेचा सत्तेचा डोंगर उचलू, असे मत मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केले. महापालिकेची निवडणूक सोपी नाही. चार प्रभागांतील उमेदवारांना सरासरी ३२ हजार मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे.
अश्वमेधाचा घोडा सोडलाय
पुणे पदवीधर मतदारसंघातून भैय्या माने यांचा अश्वमेधाचा घोडा दोन महिन्यांपूर्वीच सोडला आहे. यापूर्वीच्या पदवीधरच्या चार निवडणुकांत राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवली आहे. आम्ही भाजपला आमचे बळ सांगू, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.