Kolhapur News: सार्वजनिक आरोग्यसह वैद्यकीय शिक्षण विभाग संशयाच्या भोवऱ्यात; बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबद्दल कारवाईची प्रतीक्षा
By समीर देशपांडे | Updated: November 20, 2025 16:31 IST2025-11-20T16:30:41+5:302025-11-20T16:31:33+5:30
राज्याच्या आरोग्य विभागाची धुरा असलेल्या मंत्री मुश्रीफ, आबिटकरांच्या जिल्ह्यातच भोंगळ कारभार

Kolhapur News: सार्वजनिक आरोग्यसह वैद्यकीय शिक्षण विभाग संशयाच्या भोवऱ्यात; बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबद्दल कारवाईची प्रतीक्षा
समीर देशपांडे
कोल्हापूर : येथील सीपीआर आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून बोगस दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर्स संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूरचेच आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे देखील कोल्हापूरचेच. अशा स्थितीत आता दोषींवर कारवाई होणार की सीपीआरमधील गैरकारभाराच्या प्रकरणांसारखेच ‘फाइलबंद’ होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ३५६ दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या बदल्या करून घेतलेल्या काही शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची छाननी सुरू आहे; परंतु काही शिक्षकांनी या दोन्ही खात्याच्या डॉक्टरांना हाताशी धरून प्रसंगी आर्थिक व्यवहार करून प्रमाणपत्रे पदरात पाडून घेतल्याच्या तथ्य असलेल्या तक्रारी झाल्या आहेत.
यातूनच एका शिक्षकाने आपले यूआयडी कार्डच परत केले आहेत. या प्रकरणात तीन शिक्षक निलंबित झाले आहेत, तर १७ जणांना नोटीस पाठवून त्यांचे खुलासे मागवण्यात आले आहेत. अशातच दोन प्रमाणपत्रांबाबत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक आणि सीपीआरमधील दोन प्राध्यापक दोषी असल्याचा अहवाल आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
याच्या मुळाशी जाण्याची गरज
या सगळ्या प्रकरणाच्या वास्तविक मुळाशी जाण्याची गरज आहे. यात कोणी कोणी कारभार केला याची उघड चर्चा सीपीआर आवारात सुरू आहे. यातूनच एका वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या महत्त्वपूर्ण पदाचा कार्यभार विनंती करून सोडला आहे. कारण यात आपल्याला कुठेही सही करायला लागू नये यासाठी त्यांनी ही दक्षता घेतल्याचे सांगण्यात येते. आता दोन्ही मंत्री आपल्याच जिल्ह्यात याबद्दल नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
१७ शिक्षकांबाबत आज सीईओ घेणार निर्णय
जिल्हा परिषदेच्या १७ शिक्षकांचे खुलासे प्राथमिक शिक्षण विभागाकडे आले असून, ते आज गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहेत. ते पाहून या शिक्षकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
आणखी एक बॉम्ब
या चौकशीतून सीपीआरमधील अशा प्रमाणपत्राचा आणखी एक कारनामा दोन दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीपीआरमधील ‘सोनरी टोळी’चे धाबे दणाणले आहे.
तपासणी न करताच आजारपणाचा दाखला देणाऱ्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांबाबतचा अहवाल अजूनही माझ्याकडे आलेला नाही. तो आल्यानंतर पुढची प्रक्रिया केली जाईल. -दिलीप माने, उपसंचालक, आरोग्य कोल्हापूर मंडळ
सीपीआरमधील दोन डॉक्टरांबद्दलचा अहवाल मला मिळाला असून, पुढील कारवाईसाठी तो वैद्यकीय संचालक आणि आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. - डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर